‘चित्रपट महोत्सवांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे महोत्सवातील विविध देशांचे चित्रपट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे,’ असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. तसेच आशियाई चित्रपटांचा हा महोत्सव एकाच राज्यापुरता मर्यादित न ठेवता अन्य राज्यांमध्येही आयोजित करण्याचे आवाहन तावडे यांनी या वेळी केले.

‘एशियन फिल्म फाउंडेशन’ आणि ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरमध्ये नुकताच झाला त्यावेळी ते बोलत होते.  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी असे महोत्सव महाविद्यालयांमधूनच व्हायला हवेत, असे ते म्हणाले.

हिंदी चित्रपटातील भरीव योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन या वेळी सन्मानित करण्यात आले.

झाड लावल्यानंतर काही वर्षांनी त्याची फळे मिळतात, आज इतक्या वर्षांनंतर आपल्या मेहनतीची फळे पुरस्कारांच्या रूपाने चाखायला मिळत असल्याबद्दल वहिदा रेहमान यांनी समाधान व्यक्त केले. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांचे श्रेय त्यांनी त्यांच्या दिग्दर्शकांचे, तंत्रज्ञांचे असल्याचे स्पष्ट केले. तर या पुरस्काराच्या निमित्ताने वहिदाजींच्या कारकीर्दीचा आढावा घेताना कॅ मेऱ्याच्या कुठल्याही कोनातून तुम्ही पाहिले तर वहिदा रेहमान यांच्या चेहऱ्यातील गोडवाच तुम्हाला जाणवतो, अशा शब्दांत श्याम बेनेगल यांनी त्यांची तारीफ केली.

वहिदा रेहमान यांच्या अभिनयाने नटलेला ‘गाइड’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड असल्याचे त्यांनी नमूद केले. यानिमित्ताने वहिदा रेहमान यांच्या जीवनावर आधारित नासरीन मुन्नी कबीर लिखित ‘वहिदा रेहमान थ्रू इंटरव्ह्य़ू’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद असलेले ‘वहिदा रेहमान हितगुज’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.  मिलिंद चंपानेरकर यांनी हे पुस्तक अनुवादित केले असून ‘रोहन प्रकाशन’ने प्रकाशित केले आहे. या महोत्सवाचा प्रारंभ ‘प्रियमानसम’ या जगातील तिसऱ्या संस्कृत चित्रपटाने करण्यात आला.