सुशांतसिंग राजपूत आणि परिणिती चोप्राच्या 'शुद्ध देसी रोमान्स'चा टिझर तुम्हाला नक्कीच ७० च्या दशकात घेऊन जाईल. या चित्रपटाची पहिली झलक पाहताना याचे पोस्टर हाताने रंगविलेले आढळून येते, तर चित्रपटाच्या टिझररमध्ये दूरदर्शनवरील एका जुन्या लघुचित्रपटातील 'एक चिडीया, अनेक चिडिया' हे गाणे दाखविण्यात आले आहे, जे गतकाळची आठवण करून देते. चित्रपटाच्या पहिल्या प्रोमोमध्ये 'काय पो चे' या आपल्या पहिल्याच चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळालेला अभिनेता सुशांत (रघू) राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री परिणिताबरोबर (गायत्री) रोमान्स करताना दिसतो. परिणितीची या चित्रपटातील व्यक्तिरेखा 'लेडिज व्हर्सेस रिकी बहेल' आणि 'इशकजादे' या तिच्या चित्रपटांमधील व्यक्तिरेखांप्रमणेच बोल्ड असून, टिझरमध्ये तिला धुम्रपान करताना दाखविले आहे. चित्रपटाच्या दुस-या टिझरमध्ये सुशांत वाणी कपूर या बॉलिवूडमधील नवीन अभिनेत्रीबरोबर रोमान्स करताना दिसतो. नाविन्यपूर्ण आणि वास्तववादी प्रममकथेच्या या चित्रपटात प्रेम, आकर्षण आणि बांधिलकीचा अतिशय रोमहर्षक प्रवास दाखवला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनिष शर्मा याचे असून याआधी त्याने 'बॅन्ड बाजा बारात' आणि 'लेडिज व्हर्सेस रिकी बहेल' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा जयदीप सहानीची असून आदित्य चोप्रा चित्रपटाचा निर्माता आहे. ऋषी कपूरचीदेखील भूमिका असलेले हा चित्रपट १३ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.