|| रेश्मा राईकवार
विनोदी भयपटांची लाट आल्यापासून भुतांचे प्रकार किती याबद्दल आपल्या ज्ञानात अमूल्य भर पाडण्याचं काम बॉलीवुडी लेखक-दिग्दर्शकांकडून सुरू आहे. स्त्री झाली… मुडिया पैरी झाली… आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर दाखल झालेल्या ‘भूत पोलीस’ या चित्रपटातून किचकांडी या नव्या भुताची ओळख आपल्याला करून देण्यात आली आहे. अर्थात, हे भूत दिसतं कसं आणि वागतं कसं याचे सगळे प्रकार जुन्या बॉलीवुडी पटातलेच असले तरी त्याचं नाव मात्र वेगळं आहे. पवन कृपलानी दिग्दर्शित या चित्रपटात भयाची मात्रा कमी आणि विनोदाची जास्त असल्याने हा भूतपट आपल्याला फारसा न छळता मनोरंजन करतो.

याच वर्षी आलेल्या ‘रुही’ चित्रपटाने भूत, आत्मा घालवणाऱ्यांचं एक मंदिरवजा जग आपल्यासमोर उभं के लं होतं. इथं भुतांना घालवणाऱ्या पोलिसांची म्हणजेच तांत्रिकांची कथा असल्याने लेखक-दिग्दर्शकाने या विश्वात आपल्याला मुक्त सैर घडवून आणली आहे. विभूती नामक बडे भैया (सैफ अली खान) आणि चिरौंजी ऊर्फ चिकू  हे छोटे भैया (अर्जुन कपूर) यांची गोष्टच तंत्रविद्येपासून सुरू होते. दोन्ही भावांच्या स्वभावात जमीन-अस्मानाचा फरक आहे. विभूतीचा भुताखेतांवर विश्वास नाही. वडिलांकडे ही तंत्रविद्या होती आणि ते नावाजलेले तांत्रिक होते, या एका भांडवलावर लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत आपला पोट भरण्याचा हा व्यवसाय तो चालवतो आहे. अत्यंत व्यवहारी असलेल्या विभूतीला यात फक्त पैसा दिसतो. आपण भूत घालवण्याचे काम करतो आणि त्यासाठी आपल्याला जीएसटीसकट ग्राहकांकडून पैसे मिळाले पाहिजेत, याबाबत तो आग्रही आहे. तर चिकू  हा अत्यंत प्रामाणिक आहे. वडिलांनी या तंत्रविद्येचा वारसा आपल्याला दिलेला आहे. चिकू कडे वडिलांनी दिलेला तंत्रविद्येसंदर्भातला एक जुना ग्रंथही आहे. या ग्रंथाचा अभ्यास करून, साधना करून आपली तंत्रविद्या अधिकाधिक प्रभावी करायला हवी. प्रसंगी पैसेही न घेता भूतपिशाचांनी बाधित असलेल्या लोकांची आपण सुटका करायला हवी या मताचा तो आहे. तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना अशा पद्धतीची ही भावांची जोडगोळी ठिकठिकाणी विभूती शैलीत भूत घालवत फिरत असते. त्यांच्या या गमतीदार क थेत मायाच्या येण्याने खरं भूत दाखल होतं. मायाची मालकी असलेल्या चहाच्या मळ्यांमध्ये किचकांडी नावाचं भूत आहे. या भुताच्या भीतीमुळे लोक लवकर काम टाकू न घरी पळत असतात. त्यामुळे या किचकांडीला घालवण्यासाठी विभूती आणि चिकू ला घेऊन माया धरमशालात पोहोचते. हे किचकांडी नामक भूत घालवताना दोघं भाऊ आपल्या विरोधी स्वभावातून जो गोंधळ घालतात त्याचं नाव ‘भूत पोलीस’.

‘भूत पोलीस’ हा विनोदी भयपट आहे, त्यामुळे अर्थातच विनोदी फोडणी चित्रपटात जास्त आहे. यातल्या भुताची अगदी एक-दोन क्षणात भीती वाटते, बाकी सगळा मामला विभूतीच्या कारवायांचा आहे. कथेपेक्षाही कलाकार ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे असे म्हणता येईल. त्यातही सैफ अली खानने विभूतीच्या भूमिके त जी धमाल उडवून दिली आहे त्याला तोड नाही. अतरंगी कपडे घालणारा, सतत मुलींच्या पाठी असलेला, आपल्याला हवं तसं जगणारा छंदीफं दी विभूती खास सैफ शैलीत इथं पाहायला मिळतो. कितीही विचित्र वागला तरी त्याचं भावावर खूप प्रेम आहे त्यामुळे तो त्याला सोडून जाऊ शकत नाही. भावाची कळकळ समजून घेऊनही आपल्या उनाडक्या करत जगण्यापासून विभूती दूर हटत नाही. या सगळ्या गोष्टी सैफने खूप गमतीशीर पद्धतीने रंगवल्या आहेत. प्रामाणिक चिकू च्या भूमिके त अर्जुन कपूरही फिट बसला आहे. जॅकलिन फर्नांडिस इथं मायाच्या बहिणीच्या भूमिके त आहे. जॅकलिनची भूमिका ही तिच्या नेहमीच्या साचेबद्ध भूमिकांपेक्षा थोडी वेगळी आहे. तर यामीही मायाच्या भूमिके त चपखल बसली आहे. कलाकारांनी उचलून धरलेला हा चित्रपट कथेत मात्र सतत हेलकावे खात राहतो.

भूत आहे की नाही, यावर खुद्द लेखक-दिग्दर्शकांनाच ठाम भूमिका घ्यायची नाही. त्यामुळे अर्ध्याहून अधिक काळ चित्रपट भूतबित सब झूठ है… या ओळीवर किचकांडीसह कथा घडवत राहतो. एका क्षणाला मात्र आपल्याला खरंच किचकांडी दिसते. त्यातल्या त्यात संपूर्ण चित्रपटाचा पहिल्यापासून असलेला विनोदी बाज शेवटाकडेही बदलत नाही. त्यामुळे आपल्या मनात शिरलेलं विनोदाचं भूत शेवटपर्यंत आपल्याला हसवत राहतं.

भूत पोलीस

दिग्दर्शक – पवन कृपलानी

कलाकार – सैफ अली खान, अर्जून कपूर, यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिस, जावेद जाफरी