नाटक, चित्रपट आणि मालिका यांच्यानंतर आता वेब सिरीजचा काळ आला आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सारेच वेब सिरीजच्या विश्वात रमत असून ते या सिरीजच्या प्रेमात असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच हल्ली चित्रपटगृहांपेक्षा वेब सिरीजचा प्रेक्षक वर्ग अधिक दिसून येतो. सेक्रेड गेम, सिलेक्शन डे, इनसाइड एज, चॉपस्टीक या वेब सिरीज सध्या चांगल्या गाजत आहेत. त्यातच आता भर म्हणून अभिनेता शाहरुख खानच्या रेडचिलीज् निर्मिती ‘द बार्ड ऑफ ब्लड’ ही नवी वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बार्ड ऑफ ब्लड’ ही सिरीज लेखक बिलाल सिद्धीकी यांच्या ‘बार्ड ऑफ ब्लड’ या पुस्तकावर आधारित आहे. ही सिरीज येत्या २७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सिरीज अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमध्ये इम्रान हाश्मी, शोभिता धुलिपाला, कीर्ति कुल्हारी, विनीत सिंह प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

दरम्यान, नेटफ्लिक्सवरील ‘बार्ड ऑफ ब्लड’ या वेबसिरीजमधून इम्रान पहिल्यांदाच वेबविश्वात पदार्पण करणार आहे. या सिरीजची निर्मिती शाहरुख खान करत आहे. काही दिवसापूर्वी शाहरुखने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन याविषयीची माहिती दिली आहे.