Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अंबानी कुटुंबात नव्या सूनेचं स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मुकेश अंबानी व नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अवघ्या काही दिवसांनी अनंत राधिका मर्चंट हिच्याशी सात फेरे घेणार आहे. त्यामुळे सध्या अनंत-राधिकाच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबाची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. काल, २ जुलैला मुकेश अंबानींनी लेकाच्या लग्नाआधी ५० गरीब जोडप्यांचं लग्न लावून दिलं. या सामूहिक विवाह सोहळ्यात अंबानी कुटुंबातील सदस्यांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नाआधीच अंबानींनी २ जुलैला पालघर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे सायंकाळी ४.३० वाजता ५० गरीब जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात पारंपरिक पद्धतीने ५० जोडपी लग्नबंधनात अडकली. यावेळी स्वतः मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका अंबानी, ईशा अंबानी, आनंद पिरामल उपस्थित होते. या सर्वांनी प्रत्येक जोडप्याला भेटवस्तू दिल्या व आशीर्वाद दिले. पण अंबानी कुटुंबानी ५० जोडप्यांना नेमकं काय-काय दिलं? जाणून घ्या… हेही वाचा - Video: “या मुलांना पाहून…”, ५० गरीब जोडप्यांची लग्नगाठ बांधल्यानंतर नीता अंबानींची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “एका आईला…” माहितीनुसार, अंबानी कुटुंबाने प्रत्येक जोडप्याला मंगळसूत्र, कानातले, नथ, अंगठी असे सोन्या-चांदीचे दागिने दिले. तसंच प्रत्येक जोडप्याला १ लाख १ हजाराचा चेक दिला. याशिवाय वर्षभरासाठी पुरेसा असा किराणा सामान, घरगुती वस्तू प्रत्येक जोडप्याला दिल्या; ज्यामध्ये भांडी, गॅस, मिक्सर, गादी, उशा इत्यादी ३६ प्रकारच्या जीवनावश्क वस्तू अंबानी कुटुंबाकडून देण्यात आल्या. या सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांसाठी भव्य भोजन सोहळा आयोजन करण्यात आला होता. याआधी मार्च महिन्यात अंबानी कुटुंबाने जामनगर येथे अन्नसेवा केली होती. ज्यामध्ये ५१००० हजार लोकांना जेवण देण्यात आलं होतं. हेही वाचा – Video: नव्या घरात रुपाली भोसले खास मैत्रीण गौरी कुलकर्णीबरोबर थिरकली, ‘पुष्पा २’मधील ‘सूसेकी’ गाण्यावर धरला ठेका दरम्यान, १२ जुलैला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं हिंदू पद्धतीनं लग्न होणार आहे. त्यानंतर १३ जुलैला शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम होणार असून १४ जुलैला मोठा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या लग्नसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटींसह दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.