Thalapathy Vijay : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता थलपती विजयच्या TVK पक्षाला मोठं यश मिळालं आहे. विजयने २ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाची स्थापना केली होती. या निवडणुकांसाठी तो गेली दोन वर्षे तयारी करत होता. जोसेफ विजय चंद्रशेखर हे थलपतीचं मूळ नाव. तामिळनाडूच्या निकालाची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा होत आहे. याठिकाणी सत्तापालट होऊन आता ‘थलपती’चा मोठा ‘विजय’ झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. आता अभिनेत्याचं मूळ नाव जोसेफ विजय असलं, तरी फॅन्स त्याला ‘थलपती’ म्हणून ओळखतात. आता अनेकांना प्रश्न पडला असेल…’थलपती’ म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ जाणून घेऊयात…
‘थलपती’ म्हणजे काय?
‘थलपती’ हा एक तमिळ शब्द आहे. एखाद्या गटाचा, सैन्याचा किंवा जनतेच्या नेत्याला संबोधण्यासाठी ‘थलपती’ हा शब्द वापरला जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर ‘थलपती’ (Thalapathy) या तमिळ शब्दाचा अर्थ ‘सेनापती’, ‘प्रमुख’ किंवा ‘नेता’ असा होतो. साऊथ इंडस्ट्रीमध्ये ‘थलपती’ हा शब्द खूप आदरणीय मानला जातो. विजयच्या चाहत्यांनी त्याला हे टोपणनाव दिलं आहे.
थलपती विजय हे नाव कसं मिळालं?
९० च्या दशकापासून थलपती विजय हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा स्टार आहे. त्याने करिअरच्या सुरुवातीच्या दोन वर्षांतच १२ चित्रपटांमध्ये काम केलं, तसेच यापैकी ६ चित्रपटांचं दिग्दर्शक सुद्धा केलं होतं. अभिनेत्याचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनी ‘रसिगन’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. यानंतर विजयला त्याच्या वडिलांनी १९९४ मध्ये इलयाथलपती ही पदवी/ टायटल दिलं, ज्याचा अर्थ होता तरुण नेता. कालांतराने इलयाथलपतीवरून त्याला सगळे थलपती विजय म्हणू लागले. यामागचं मुख्य कारण म्हणजे विजयचे अनेक चित्रपट यशस्वी झाले. तो ‘मास हिरो’ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळे, ‘तरुण’ (इलया) हा शब्द काढून विजयला ‘थलपती’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. २००३-२००४ मधील ‘तिरुमलाई’ (Thirumalai) आणि ‘घिल्ली’ (Ghilli) या चित्रपटांनी विजयच्या करिअरला मोठी कलाटणी दिली.
दरम्यान, थलपती विजय आणि त्याच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूच्या निवडणुकीत मोठा करीश्मा दाखवला आहे. या पक्षाने १०० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरा गेलेला हा पक्ष आता तामिळनाडूतला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
