करोना आणि त्यामुळं गेल्या वर्षी लागलेला लॉकडाऊन याचा मोठा फायदा वेबविश्वाला झाला. अभिनेता अपारशक्ती खुरानाने याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर त्यानं सावध राहण्यासही सांगितलं आहे.

अपारशक्ती म्हणतो की, थिएटर्स की ओटीटी यांच्याबद्दल मतभेद होते आणि ते राहतील. पण हे तसं आहे जे सॅटेलाईट टिव्हीच्या बाबतीत झालं होतं. तेव्हा लोक म्हणतच होते की आता कशाला कोणी थिएटरला जाईल पिक्चर बघायला…पण आपल्याला परिस्थिती माहित आहे. दोन्ही माध्यमं टिकून राहिली. काही टिव्ही चॅनेल्स आहेत जी आजही चांगले कार्यक्रम, चांगले विषय लोकांपर्यंत पोहचवत असतात पण काही चॅनेल्स मात्र भ्रष्ट झाली आहेत.

पण अपारशक्तीला अशी भीती वाटत आहे की, एवढी मागणी आणि प्रतिसाद पाहता भविष्यात ओटीटी माध्यमही भ्रष्ट होईल. तो म्हणाला, “टिव्हीचं तर तसं झालं आहेच. आता आपण आशा करूया की ओटीटीच्या बाबतीत तसं होणार नाही. त्यांनी त्यांचा दर्जा टिकवून ठेवावा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. आपण आशा करू की हे होणार नाही.”

अपारशक्तीने स्त्री, लुकाछुप्पी अशा चित्रपटांत काम केलं आहे. तो सध्या एका वेबसीरीजमध्येही काम करत आहे.