When Asha Bhosle Called Lata Mangeshkar Viral Video: गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच सोशल मीडियावर त्यांच्या अनेक आठवणींचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यापैकीच एक अतिशय भावूक करणारा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आशाताई एका कार्यक्रमादरम्यान आपल्या लाडक्या मोठ्या बहिणीला, लता मंगेशकर यांना फोन करताना दिसत आहेत. मंचावर सर्वांसमोर जेव्हा त्या लता दीदींना फोन लावतात, तेव्हा त्या दोघांमधील प्रेमळ संवादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

आशाताई व लतादीदींमध्ये खूप प्रेम होतं. एकदा झी टीव्हीच्या एका शोमध्ये आशा भोसले यांनी हजेरी लावली होती. तेव्हा शेजुती दास नावाच्या एका स्पर्धकाला लतादीदींचा आवाज ऐकायचा होता. तिने आशाताईंसमोर तिची इच्छा व्यक्त केली आणि आशाताईंनी थेट लतादीदींना फोन लावला.

फोन लावल्यावर आशाताई म्हणाल्या, “हॅलो दीदी, मी इथे झी टीव्हीच्या एका कार्यक्रमात आहे. इथे सर्वांचा तुझा आवाज ऐकायचाय.” मग आशाताईंनी शेजुतीला जवळ बोलावलं. तिच्याशी लतादीदींना संवाद साधला. मी गाणं गाऊ शकत नाही, पण तुझ्याशी बोलू शकते, असं त्या म्हणाल्या. शेजुती लतादीदींशी बोलताना भावुक झाली. लतादीदींनी ‘मला बंगाली येतं,’ असं म्हणत तिच्याशी बंगालीत संवाद साधला.

पाहा आशा भोसलेंचा व्हिडीओ

आशाताईंच्या निधनानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लता दीदींचा आवाज ऐकताच आशाताईंचा चेहरा खुलतो, हा क्षण उपस्थितांना भारावून टाकणारा होता. आता आशाताई व लतादीदी दोघीही आपल्यात नसल्याने, हा व्हिडीओ पाहून अनेक चाहते भावुक झाले आहेत.

दरम्यान, आशा भोसले व लता मंगेशकर या दोन्ही बहिणींच्या निधनाचा एक अनोखा योगायोग सध्या चर्चेत आहे. लतादीदींचं निधन ९२ व्या वर्षी झालं, त्यांचं निधन झालं त्यादिवशी रविवार होता. त्याचप्रमाणे आशा भोसले यांनीही ९२ व्या वर्षी रविवारीच अखेरचा श्वास घेतला. दोघींचेही निधन मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात झाले. आशा भोसले यांच्यावर आज सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव सध्या लोअर परळ येथील त्यांच्या घरी असून सेलिब्रिटी तिथे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जात आहेत.