‘श्रीदेवींसोबत लग्न करायचं असेल तर प्रथम…’; बोनी कपूर यांनी सांगितला भन्नाट किस्सा

बोनी कपूर त्यावेळी श्रीदेवींच्या प्रेमात आकंठ बुडाले होते

बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचा आज वाढदिवस. त्यामुळे कलाविश्वापासून ते चाहत्यांपर्यंत प्रत्येक जण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याविषयी, त्यांच्या करिअरविषयी चर्चादेखील रंगत आहेत. या सगळ्यात चर्चा रंगली आहे ती म्हणजे त्यांच्या आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या लव्हस्टोरीची. श्रीदेवी यांचं निधन होऊन आता बराच कालावधी लोटला आहे. मात्र, तरीदेखील त्या आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. तर बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची लव्हस्टोरी कोणत्याही फिल्मीस्टोरीपेक्षा कमी नाही. श्रीदेवीसोबत लग्न करायचं असेल तर आधी त्यांच्या आईंशी मैत्री करायला हवी हे बोनी कपूर यांना समजलं होतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांनी श्रीदेवी यांच्या आईला इम्प्रेस करण्यास सुरुवात केली असं बोनी कपूर यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं.

त्याकाळी श्रीदेवी तुफान लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्री होत्या. मात्र, त्यांच्या चित्रपटांच्या तारखा आणि अन्य प्रोफेशनल गोष्टी श्रीदेवी यांच्या आई पाहत होत्या. त्याचवेळी बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’साठी श्रीदेवींना ऑफर दिली. मात्र या चित्रपटासाठी श्रीदेवींच्या आईने १० लाख रुपये मानधन मागितलं. विशेष म्हणजे १० नव्हे, तर ११ लाख रुपये देईन असं बोनी कपूर म्हणाले.

“त्यावेळी श्रीदेवी या सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्या एका चित्रपटासाठी अंदाजे ८ ते ९ लाख रुपये मानधन घेत होत्या. माझ्या चित्रपटात श्रीदेवी यांना घेण्यासाठी मी ११ लाख रुपये मानधन देईन असं म्हणालो. कदाचित माझं हे बोलणं ऐकून मी वेडा झालोय की काय असा त्यांचा समज झाला असेल. पण त्यावेळी मला श्रीदेवींशी लग्न करण्यासाठी प्रथम त्यांच्या आईला इम्प्रेस करणं गरजेचं होतं”, असं बोनी कपूर यांनी मुलाखतीत सांगितलं.

दरम्यान, श्रीदेवी यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या बोनी कपूर यांचं पहिलं लग्न झालं होतं व त्यांना दोन मुलंदेखील होते. मात्र, त्यांनी पत्नी मोना यांच्यासमोर श्रीदेवीवर असलेल्या प्रेमाची कबुलीदेखील दिली होती. परंतु, बोनी कपूर यांनी श्रीदेवींना प्रपोज करण्यासाठी अनेक वर्ष घेतले. त्यांनी १९९४ साली श्रीदेवींना लग्नाची मागणी घातली आणि १९९६ मध्ये ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: When boney kapoor love with sridevi lovestory dcp