Asha Bhosle RD Burman Memories: दिग्गज गायिका आशा भोसले यांचं ९२ व्या वर्षी निधन झालं. आशा भोसले यांनी दिवंगत संगीतकार राहुल देव बर्मन म्हणजेच आर डी बर्मन यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. आर डी बर्मन यांना प्रेमाने लोक ‘पंचम दा’ म्हणत. १९६० ते १९९० या तीन दशकांमध्ये आरडी बर्मन यांनी त्यांच्या संगीताच्या जादूने रसिकांना मंत्रमुग्ध केलं होतं. आशा भोसले आणि किशोर कुमारसह अनेक गायकांना त्यांच्यामुळे यशाचं शिखर गाठता आलं. बर्मन यांनी जवळपास ३३१ सिनेमांना संगीत दिलं होतं. आशा भोसले यांनी एकदा आर डी बर्मन यांच्याबरोबरची पहिली भेट आणि त्यांनी भेट म्हणून दिलेल्या झाडूचा किस्सा सांगितला होता.

आशा भोसले व आर डी बर्मन यांची पहिली भेट

प्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि दिग्गज संगीतकार आरडी बर्मन यांची प्रेम कहाणी सर्वश्रूत आहे. आशा भोसले यांनी एका मुलाखतीत, अत्यंत प्रतिभावान असलेल्या आरडी बर्मन यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली होती. “जाड चष्मा घातलेला सडपातळ तरुण माझ्याजवळ आला व त्याने माझा ऑटोग्राफ मागितला, त्याने माझे मराठी नाट्यसंगीत रेडिओवर ऐकल्याचं सांगितलं होतं,” असं त्या म्हणाल्या होत्या.

आशा भोसलेंनी बर्मन यांना शिक्षण पूर्ण करण्याचा दिलेला सल्ला

दोघांची मैत्री वाढत असताना आशाताईंच्या समजलं की बर्मन यांनी कोलकाता येथील महाविद्यालय सोडलं आहे. बर्मन यांच्या भवितव्याबद्दल आशाताईंना काळजी वाटू लागली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना शिक्षण पूर्ण करण्यास सांगितलं. “त्याने कोलकात्यातील कॉलेज सोडलं होतं. मी त्याला ग्रॅज्युएशन पूर्ण करायला हवं होतं, असं सांगितलं. त्यानंतर बाकीच्या रेकॉर्डिंगवेळी तो माझ्याशी नाराज होता,” असं आशा भोसलेंनी सांगितलं होतं.

जेव्हा बर्मन यांनी आशा भोसलेंना भेट दिलेला झाडू

१९६६ मध्ये बर्मन यांनी रीटा पटेलशी लग्न केलं, पण अवघ्या पाच वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. १९८० मध्ये त्यांनी आशा भोसले यांच्याशी लग्नगाठ बांधली. आशाताईंनी बर्मन यांच्या विनोदी स्वभावाचा किस्सा सांगितला. बर्मन यांनी एकदा झाडू आणि गुलाबाचं फूट भेट म्हणून दिलं होतं. “एक वेळ तो आनंदाने खाली जमिनीवर झोपेल, परंतु त्याची रेकॉर्डिंग सिस्टीम, त्याचा स्टिरिओ नीट ठेवलेला असायचा. तो काय खातो याची त्याला पर्वा नसायची, कारण तो संगीत जगायचा, खायचा आणि झोपायचा. त्यामुळे, जेव्हा मला हा खरा माणूस सापडला तेव्हा मी निश्चिंत झाले. त्याला त्याच्या संगीताबरोबर राहू दिलं की त्याच्याइतका शांत व काळजी घेणारा पती मी पाहिला नाही. पंचमबरोबरचे आयुष्य अगदी शांत होते,” असं आशा भोसलेंनी म्हटलं होतं.

asha-bhosle-rd-burman-memories
आशा भोसले व आर डी बर्मन (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

बर्मन यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल काय म्हणाल्या होत्या आशा भोसले?

बर्मन यांना खंडाळ्याला जायचं होतं, असं आशाताईंनी त्यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगितलं होतं. “शेवटच्या क्षणी “खूप दुखत आहे” असं तो म्हणाला होता. “तो माझे नाव ‘आ..आ..’ घेण्याचा प्रयत्न करत होता, पण शब्द पूर्ण करू शकला नाही.” बर्मन यांना दारू पिण्याच्या सवयीवर मात करता आली असती तर ते जगू शकले असते, असं आशाताईंना वाटायचं. बर्मन यांचे ४ जानेवारी १९९४ रोजी ५४ व्या वर्षी मुंबईत निधन झाले होते.

आशा भोसले यांनी आर. डी. बर्मन यांच्या संगीतबद्ध केलेली ५०० हून अधिक गाणी गायली. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, आओ हुजूर तुमको, चुरा लिया है तुमको जो दिल को, ओ हसीना जुल्फोंवाली, ले गई ले गई, मेरा कुछ सामान, खाली हाथ शाम आई है, ही त्यांची काही लोकप्रिय गाणी आहेत.