हिंदी चित्रपटसृष्टीत यशाचे मापदंड रचणारा ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ हा चित्रपट शाहरूख खान नाकारणार होता. या चित्रपटातील भूमिका खूपच बायकी वाटल्यामुळे मी तसा निर्णय घेणार होतो, असे खुद्ध शाहरूखने सांगितले आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या माहितीपटात शाहरूखने ही गोष्ट सांगितली. या माहितीपटात ‘डीडीएलजे’विषयी माहित नसलेल्या अनेक गोष्टी ऐकायला आणि पहायला मिळतील. शाहरुख त्यावेळी ‘डर’, ‘बाजीगर’, ‘अंजाम’ यासारख्या चित्रपटांतून एकामागोमाग एक खलनायकी व्यक्तिरेखा साकारत होता. त्यामुळे शाहरुखला ‘दिलवाले दुल्हनिया’सारख्या रोमँटिक चित्रपटात काम करण्याची कल्पना तितकीशी पटली नव्हती. त्यामुळेच शाहरूखने चित्रपटासाठी आदित्य चोप्राला नकार दिला होता. याशिवाय, चित्रीकरणापूर्वी बहीण आजारी असल्यामुळे शाहरूखची मनस्थिती फारशी चांगली नव्हती, अशा अनेक गोष्टींचा उल्लेख या माहितीपटात आहे.