छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेली १३ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार देखील सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण तुम्हाला माहितीये का एकदा बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत हजेरी लावली होती. शाहरुखचा तेव्हाचा व्हिडीओ आता पुन्हा एकदा चर्चेत आहे.
शाहरुखने ‘चैन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत हजेरी लावली होती. त्यावेळी मालिकेत सर्वजण मजा मस्ती करताना दिसत होते. अनेकांनी शाहरुखची स्टाइल देखील कॉपी केल्याचे पाहायला मिळाले. पण दया बेनने मात्र शाहरुखलाच गरबा कसा खेळायचा हे शिकवले होते. तेव्हाचा हा व्हिडीओ आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दयाबेन शाहरुखला गरबाच्या स्टेप्स शिकवताना दिसत आहे. दरम्यान जेठालाल देखील शाहरुखला गरबा स्टेप्स शिकवत असल्याचे दिसत आहे. शाहरुख आणि जेठालाल यांचा गरबा पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.