प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. १० ऑगस्ट रोजी जीममध्ये व्यायाम करताना त्यांना हृद्यविकाराचा झटका आला होता. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्या मेंदूनेही हळूहळू काम करणे थांबवले. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सुधारावी यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत होते. मध्यंतरी ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. या महान विनोदवीराच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर अभिनेता कृष्णा अभिषेक याने हळहळ व्यक्त केली आहे. त्या दोघांनी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केले होते. कृष्णाने त्याच्या सहकलाकाराला वंदन करत श्रद्धाजंली वाहिली आहे. मिड-डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने “हे फार धक्कादायक आहे. राजू श्रीवास्तव बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करत होतो. उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल आणि ते लवकर बरे होतील अशी मला आशा होती. मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात त्यांच्यासोबत केली होती. मी एका चित्रपटामध्ये लॉरेन्स डिसूझा यांना दिग्दर्शनामध्ये मदत करत होतो. सहदिग्दर्शक म्हणून काम करत असलेल्या या चित्रपटामध्ये राजू श्रीवास्तव यांनी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली होती. माझ्या कारकिर्दीची सुरुवात त्यांच्या चित्रपटाने झाली असे मी म्हणू शकतो. तेव्हापासून आमचे संबंध जोडले गेले. आम्ही बऱ्याच चित्रपटामध्ये, मालिकांमध्ये आणि रिअ‍ॅलिटी शोजमध्ये एकत्र काम केले होते. ते फार सज्जन गृहस्थ होते. त्यांच्या आत्माला शांती मिळो असे म्हटले आहे”

“द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेज” या कार्यक्रमामुळे राजू श्रीवास्तव यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती. या कार्यक्रमाचे ते उपविजेते होते. ते बॉलिवूडच्या कलाकारांची उत्तम मिमिक्री करायचे. त्याने तयार केलेले गजोधर भैय्या हे पात्र फार लोकप्रिय झाले होते. त्यांनी ‘शक्तीमान’, ‘कॉमेडी का महामुकाबला’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ अशा कार्यक्रमामध्ये काम केले आहे. ते बिग बॉसमध्येही सहभागी झाले होते. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ अशा काही चित्रपटांमध्येही काम केले आहे.

आणखी वाचा – “अमिताभ बच्चन यांच्यामुळे…” दिवंगत कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांनी मानले होते आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सिनेसृष्टीमधील बऱ्याच कलाकारांनी राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.