Thalapathy Vijay’s Family : थलपती विजय हा तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. आता तो राजकारणातही पूर्णपणे सक्रिय झाला आहे. नुकत्याच झालेल्या तमिळनाडू निवडणुकांच्या निकलांनुसार, त्याच्या टीव्हीके (TVK) पक्षाने १०७ जागांवर आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत, आता थलपती विजयच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. 

विजय काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने संगीता यांनी घटस्फोटाची याचिका दाखल केल्यामुळे चर्चेत आला होता. त्यावेळी अभिनेत्याच्या पत्नीने त्याच्यावर लोकप्रिय अभिनेत्रीसह विवाह बाह्य संबंध असल्याचा दावा केला होता. ज्यानंतर त्याचं व दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचं नाव जोडलं गेलं आणि त्यानंतर अनेकदा हे दोघे एकत्र स्पॉट झाल्यामुळेही याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली.

४ मे रोजी निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी अभिनेत्री विजयच्या घरी गेल्याचा व्हिडीओसुद्धा काल ४ मे रोजी व्हायरल झाला होता. त्यामुळे सध्या विजय व त्रिशा यांच्याबद्दलच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. अद्याप दोघांनीही याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पत्नीसह काही दिवसांपूर्वीच विजयचा मुलगासुद्धा चर्चेत आला होता. विजयच्या मुलाने आपल्या नावातून वडिलांचं आडनाव हटवल्याची चर्चा आहे. विजय थलपतीला किती मुलं आहेत आणि ती काय करतात, विजयच्या मुलाने खरच नावामध्ये बदल केला आहे का याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

विजयला किती मुलं आहेत?

विजय थलपतीचं लग्न संगीता यांच्याशी झालेलं. दोघांनी आंतरधर्मीय लग्न केलं होतं. विजयची पत्नी हिंदू आहे तर तो ख्रिश्चन आहे. विजय व संगीता यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुलं आहेत. विजयच्या मुलाचं नाव जेसन संजय असं आहे तर त्याच्या लेकीचं नाव दिव्या साशा आहे.  अभिनेत्याची मुलगी २० वर्षांची तर मुलगा २५ वर्षांचा आहे. दोघेही लाइमलाइटपासून दूर असतात. 

काय करतात विजयची मुलं?

२५ वर्षीय वय असलेल्या विजयच्या मुलाने लंडनमधून शिक्षण पूर्ण केलं असून त्याने स्क्रीनरायटिंगचं शिक्षण घेतलं आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार संजय सध्या त्याचा पहिला चित्रपट ‘सिग्मा’साठी काम करत आहे. विजयचा मुलगा या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार असून यामध्ये संदीप किशन मुख्य भूमिकेत आहे. विजयच्या मुलीबद्दल बोलायचं झालं तर त्याची लेक या सगळ्यापासून दूर असल्याने ती नेमकं काय करते याबद्दलची माहिती उपलब्ध नाहीये.

विजयच्या मुलाने नावात केला बदल

‘एबीपी’च्या माहितीनुसार जेसन संजयने त्याच्या वडिलांचं आडनाव हटवलं असून तो चित्रपटासाठी जेसन संजय एस असं नाव लावणार असल्याची चर्चा आहे. एसचा संदर्भ त्याची आई संगीता यांच्या नावावरुन असल्याचं म्हटलं जातंय. परंतु, अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

विजयबरोबर मुलाने ‘या’ चित्रपटात केलेलं काम

विजयचा मुलगा दिग्दर्शक म्हणून जरी पदार्पण करत असला तरी यापूर्वी तो एका चित्रपाटात झळकला आहे. २००९मध्ये आलेल्या  ‘वेट्टैकारन’ (Vettaikaaran)या चित्रपटातील गाण्यात तो त्याच्या वडिलांबरोबर झळकला होता.