Who Is Femina Miss India 2026 Winner Sadhavi Satish Sail : शनिवारी ओडिसा येथे झालेल्या ६१ व्या ‘फेमिना मिस इंडिया २०२६’ च्या ग्रँड फिनालेमध्ये साध्वी सतीश सैल ही ‘मिस इंडिया वर्ल्ड २०२६’ची विजेती ठरली. तिला महाराष्ट्राच्या राजनंदिनी पवार हिने अंतिम फेरीत चांगली टक्कर दिली. परंतु, राजनंदिनी स्पर्धेत फर्स्ट रनर-अप ठरली.
तर जम्मू काश्मीरची श्री अद्वैता हिला सेकंड रनर-अपचा किताब मिळाला. यावर्षी निकिता पोरवाल हिने साध्वीला मुकुट घातला. ‘मिस इंडिया वर्ल्ड २०२६’ची विजेती साध्वी सैल कोण आहे आणि ती काय करते, याबद्दल जाणून घेऊया…
फेमिना मिस इंडिया २०२६ची विजेती साध्वी सैल काय करते?
गोवामध्ये राहणारी साध्वी सतीश सैल ही मॉडेल आणि उद्योजिका आहे. तिने अनेक फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला आहे. तसेच California Burrito सारख्या ब्रँडचा चेहराही ती राहिली आहे. याशिवाय, तिने बांधकाम आणि विकास क्षेत्रातील एका कंपनीची सह-स्थापना केली आहे.
आपल्या विजयानंतर आनंद व्यक्त करत साध्वीने ही संधी मिळाल्याबद्दल आभार मानले. एएनआयशी बोलताना ती म्हणाली, “हा क्षण अजूनही खरा वाटत नाहीये. मला ही संधी मिळाली यासाठी मी खूप आभारी आहे.” ती पुढे म्हणाली की, सर्व स्पर्धकांमध्ये चांगलं नातं निर्माण झालं होतं आणि स्पर्धेदरम्यान त्यांनी खूप छान वेळ घालवला.
साध्वी सतीश सैल हिने तिच्या सहस्पर्धकांनाही विजेतं म्हटलं आहे. ती म्हणाली, “हा प्रवास एकत्र पुढे जाण्याचा आणि मैत्री निर्माण करण्याचा होता. साधवी म्हणाली, “माझ्यासाठी आज माझ्या सगळ्या मैत्रिणी विजेत्या आहेत. आम्हा सर्वांना भारताचं नाव जगभर मोठं करायचं आहे.”
याशिवाय, आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचं प्रतिनिधित्व करण्याबाबत साधवीने उत्साहाबरोबर जबाबदारीची जाणीवही व्यक्त केली. ती म्हणाली की, प्रामाणिकपणा आणि सत्याच्या मार्गाने हा प्रवास पुढे न्यायचा आहे आणि देशाचं नाव उज्ज्वल करायचं आहे. आता पुढे खूप मोठा प्रवास बाकी आहे. ही तर फक्त सुरुवात आहे.” तसेच तिने देशवासीयांकडून आशीर्वाद आणि पाठिंब्याचीही विनंती केली.
दरम्यान, ‘मिस इंडिया वर्ल्ड २०२६’च्या अंतिम फेरीत तीन स्पर्धक होत्या. यामध्ये गोव्याची साध्वी सतीश सैल, महाराष्ट्राची राजनंदिनी पवार आणि जम्मू काश्मीरची श्री अद्वैता यांचा समावेश होता. या तिघींनी कठीण प्रश्नोत्तर फेरीत आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि शांत स्वभावाने लक्ष वेधलं. तसेच ग्लॅमर आणि पारंपरिक सौंदर्याचा सुंदर मिलाफ असलेल्या त्यांच्या आउटफिट्सनीही सर्वांची मनं जिंकली.
