Who is Sangeeta Sornalingam : तमिळ सुपरस्टार थलपती विजयच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. त्याची पत्नी संगीता विजय हिने घटस्फोटासाठी चेंगलपट्टू येथील जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २७ वर्षांच्या संसारानंतर संगीता विजयने पतीपासून विभक्त व्हायला न्यायालयात धाव घेतली आहे. तिने पतीचे एका अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोपही केले आहेत. विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगम कोण आहे? तिने घटस्फोटासाठी अर्ज का केला? ते जाणून घेऊयात.
तमिलगा वेत्री कळघमचा (TVK) नेता आणि अभिनेता विजय व त्याची पत्नी संगीता काही काळापासून वेगळे राहत असल्याच्या चर्चा होत्या. याचदरम्यान आता संगीताने विजयवर फसवणुकीचे आरोप करत घटस्फोटाची मागणी केली आहे. आता विजयबरोबरचं नातं फक्त कागदोपत्री उरलं आहे, त्यामुळे कोर्टाने घटस्फोट मंजूर करावा, अशी मागणी तिने केली आहे.
कोण आहे संगीता सोर्नालिंगम?
संगीता सोर्नालिंगम ही श्रीलंकन तमिळ वंशाची आहे. तिचा जन्म यूकेमध्ये झाला आणि ती तिथेच मोठी झाली. विजयशी लग्न करण्यापूर्वी ती ब्रिटिश नागरिक होती. संगीताचे वडील श्रीलंकेतील एक मोठे उद्योगपती आहेत. ते नंतर यूकेला स्थायिक झाले. संगीता व विजय यांनी विजय यांनी १० जुलै १९९८ रोजी युकेमध्ये नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं.
विजय व संगीताची भेट कुठे झाली होती?
विजय थलपती व संगीता सोर्नालिंगम यांची पहिली भेट खूपच फिल्मी होती. संगीता विजयची खूप मोठी चाहती होती. १९९६ मध्ये विजयचा ‘पूवे उनाक्कागा’ चित्रपट हिट झाल्यावर ती त्याचं अभिनंदन करण्यासाठी थेट लंडनहून चेन्नईला आली होती. त्यांची पहिली भेट चेन्नईच्या फिल्म सिटीमध्ये चित्रीकरणादरम्यान झाली होती.

विजयला संगीता पहिल्या नजरेतच आवडली. ती थेट लंडनहून चेन्नईला भेटायला आल्याने तो प्रभावित झाला. त्याने संगीताला घरी बोलावलं व तिची आई-वडिलांशी भेट घालून दिली. दोघांची कुटुंबे नंतर भेटली. मग विजयच्या आई-वडिलांनी संगीताला लग्नाची मागणी घातली. संगीताने होकार दिल्यावर विजयचे आई-वडील लंडनला गेले आणि तिच्या पालकांना भेटले.
विजय व संगीता सोर्नालिंगमचं आंतरधर्मीय लग्न
विजय ख्रिश्चन आहे, तर संगीता हिंदू आहे. संगीताचे आई-वडील मुलीच्या आंतरधर्मीय लग्नासाठी तयार झाले. त्यांनी दोघांचे नोंदणी पद्धतीने युकेमध्ये लग्न लावून दिले. मग २५ ऑगस्ट १९९९ रोजी त्यांनी मोठ्या थाटामाटात चेन्नईत लग्न केले. त्यानंतर चेन्नईत मोठा रिसेप्शन सोहळा झाला होता.
विजय व संगीताला मुलं किती?
विजय थलपती आणि संगीता सोर्नालिंगम यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. २००० मध्ये त्यांचा मुलगा जेसन संजयचा जन्म झाला. तर २००५ मध्ये त्यांना मुलगी झाली. तिचं नाव दिव्या साशा आहे.
संगीता सोर्नालिंगमचे आरोप नेमके काय?
संगीताने याचिकेत सांगितल्याप्रमाणे, एप्रिल २०२१ मध्ये पती विजयचे एका अभिनेत्रीबरोबर अनैतिक संबंध असल्याचं तिला समजलं. यामुळे प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. विवाहबाह्य संबंध संपवण्याचं आश्वासन विजयने दिलं होतं. पण तसं झालं नाही. तसेच त्याच्या अफेयरच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तिला अपमान सहन करावा लागला, तसेच विजयने भावनिकदृष्ट्या दुर्लक्ष केलं, असे आरोप तिने केले. सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ आणि पुन्हा ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत वकील आणि आपापसात चर्चा करून यासंदर्भात तोडगा काढण्याचे प्रयत्न केले, पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले, असंही या याचिकेत संगीताने म्हटलं आहे.
