तमिळ सुपरस्टार थलपती विजय सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचं एका अभिनेत्रीबरोबर अफेअर आहे, असा आरोप करत त्याच्या पत्नीने घटस्फोट मागितला आहे. अशातच तो अभिनेत्री त्रिशाबरोबर एका रिसेप्शनला पोहोचला. त्याने त्रिशाबरोबर ट्विनिंग केलं होतं. त्यामुळे त्रिशामुळेच विजयचा २७ वर्षांचा संसार मोडत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्रिशा कृष्णन कोण आहे? ते जाणून घेऊयात.

त्रिशाचा जन्म ४ मे १९८३ रोजी चेन्नईत झाला. तिने चेन्नईतील एथिराज कॉलेजमधून बीबीए पूर्ण केले आहे. त्रिशा कृष्णन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची क्वीन मानली जाते. त्रिशाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. १९९९ मध्ये तिने ‘मिस मद्रास’ चा किताब जिंकला होता. तिने फाल्गुनी पाठकच्या ‘मेरी चूनर उड उड जाए’ या म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं होतं. तिने १९९९ मध्ये ‘जोडी’ चित्रपटात छोट्या भूमिकेतून पदार्पण केलं. २००२ मध्ये आलेला ‘मौनम पेसियाधे’ हा तिचा मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट होता. तिने घिल्ली सिनेमात थलपती विजयबरोबर काम केलं होतं. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. 96 या चित्रपटातील ‘जानू’ या तिच्या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. पोन्नियिन सेल्वन १ व २ मध्ये तिने राजकुमारीची भूमिका साकारली होती.

११ वर्षांपूर्वी मोडला त्रिशा कृष्णनचा साखरपुडा

अक्षय कुमारबरोबर ‘खट्टा मीठा’मध्ये काम करून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्रिशाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास ती ४२ वर्षांची आहे, पण तिने अद्याप लग्न केलेलं नाही. ११ वर्षांपूर्वी २०१५ मध्ये तिचा बिझनेसमन वरुण मनियनशी साखरपुडा झाला होता. पण नंतर तो मोडला. तिचं नाव अभिनेता राणा दग्गुबातीशीही जोडलं गेलं होतं.

थलपती विजयबरोबरचे चित्रपट व अफेअरच्या चर्चा

विजय व त्रिशा यांनी घिल्ली, तिरुपाची, आथी, कुरुवी व लिओ सिनेमात एकत्र काम केलंय. मध्यंतरी तब्बल १५ वर्षे त्यांनी एकमेकांबरोबर काम केलं नव्हतं. लिओ चित्रपटानंतरच थलपती विजय व त्रिशा यांच्याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत. विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगम हिनेही विजयचं अफेअर अभिनेत्रीबरोबर आहे, त्याने ते अफेअर संपवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते अजूनही एकत्र आहेत, त्यामुळे घटस्फोट हवा आहे असा अर्ज कोर्टात केला आहे.

संगीताच्या आरोपांनंतर अवघ्या काही दिवसांतच विजय व त्रिशा एकत्र रिसेप्शनला ट्विनिंग करून पोहोचले, त्यामुळे संगीताने ज्या अभिनेत्रीचा उल्लेख केला ती त्रिशाच आहे का, अशा चर्चा आता सोशल मीडियावर रंगल्या आहेत. अद्याप थलपती विजयने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.