Hanuman Ansh Box Office Collection and Neem Karoli Baba Biopic: सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत ‘हनुमान अंश’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अवघ्या २ कोटी रुपयांच्या अत्यंत कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडत तब्बल ५० कोटी रुपयांहून अधिकचा टप्पा पार केला आहे. आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्या जीवनप्रवासावर आणि भगवान हनुमानावरील त्यांच्या अथांग भक्तीवर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी या चित्रपटातून लक्ष्मण दास यांचा ‘नीम करोली बाबा’ होण्यापर्यंतचा अद्वितीय प्रवास अत्यंत प्रभावीपणे साकारला असून संपूर्ण देशभरात या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

‘हनुमान अंश’ हा चित्रपट २० व्या शतकातील भारतावर आधारित आहे. यात लक्ष्मण दास यांचं बालपण, त्यांची आध्यात्मिक जागृती आणि पुढे ‘नीम करोली बाबा’ म्हणून ओळख हा प्रवास दाखवला आहे. हनुमानावरील त्यांची निष्ठा आणि प्रेम, दया व सेवेवर असणारा त्यांचा विश्वास या गोष्टी यात पाहायला मिळतात.

नीम करोली बाबा कोण होते?

नीम करोली बाबा हे एक हिंदू आध्यात्मिक गुरू आणि भगवान हनुमानाचे निस्सीम भक्त होते. त्यांचं खरं नाव लक्ष्मण नारायण शर्मा होते. त्यांचा जन्म साधारण १९०० मध्ये उत्तर प्रदेशातील अकबरपूर गावात झाला होता. ११ सप्टेंबर १९७३ रोजी वृंदावनमध्ये त्यांचं निधन झालं. उत्तराखंडमधील ‘कैंची धाम’ हे आश्रम बाबा नीम करोलींच्या नावाने ओळखले जाते. त्यांच्याशी संबंधित अनेक चमत्कार आणि आश्चर्यकारक कथा त्यांच्या अनुयायांकडून ऐकायला मिळतात. त्यांचे आयुष्य एखाद्या धार्मिक पुढाऱ्यासारखे नव्हते. साधू म्हणून ते अनेक वर्षे फिरले आणि मग पुन्हा कौटुंबिक जीवनात परतले. प्रेम, दया, भक्ती आणि सेवा हीच त्यांची मुख्य शिकवण होती.

नीम करोली बाबांचे नावाजलेले परदेशी अनुयायी

विराट कोहली व अनुष्का शर्मा अनेकदा नीम करोली बाबा यांच्या वृंदावन व कैंची धाम आश्रमाला भेट दिली आहे. त्याचबरोबर परदेशी अनुयायांमुळे नीम करोली बाबांचा प्रभाव हळूहळू भारताबाहेरही गेला.

राम दास (रिचर्ड अल्बर्ट): हे अमेरिकन आध्यात्मिक शिक्षक नीम करोली बाबांचे अनुयायी झाले. भारतात येण्यापूर्वी ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीत सायकोलॉजिस्ट होते. त्यांनी आपल्या अनुभवांवर ‘बी हिअर नाऊ’ (Be Here Now) हे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामुळे नीम करोली बाबांबद्दल जगभरातील लोकांना समजलं.

स्टीव्ह जॉब्स (ॲपलचे सह-संस्थापक): स्टीव्ह जॉब्स १९७० च्या दशकात भारतात आले होते. त्यांनी कैंची धामला भेट दिली होती. तेव्हा बाबांचे निधन झाले होते. १९८५ मध्ये एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, या प्रवासाने त्यांचा दृष्टिकोन बदलला.

मार्क झुकरबर्ग (मेटा/फेसबुकचे संस्थापक): जेव्हा फेसबुक कठीण काळातून जात होते, तेव्हा त्यांनी कैंची धामला भेट दिली होती. या प्रवासाने त्यांना पुन्हा जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली.

जुलिया रॉबर्ट्स (हॉलीवूड अभिनेत्री): हॉलीवूड अभिनेत्री जुलिया रॉबर्ट्सने नीम करोली बाबांचा फोटो पाहिल्यानंतर ती कशी प्रभावित झाली ते सांगितलं होतं. बाबांबद्दल काहीच माहिती नसतानाही त्यांचा प्रभाव पडला, असं तिने म्हटलं होतं.

हनुमान अंशच्या यशावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

‘हनुमान अंश’चे दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी ‘एएनआय’शी बोलताना म्हणाले, “चित्रपटाला फ्लॉप घोषित करण्याबाबत इंडस्ट्रीत काही निकष असायला हवे, असं मला वाटतं. जोपर्यंत एखादा चित्रपट चित्रपटगृहात चालतोय, तोपर्यंत त्याला हिट किंवा फ्लॉप ठरवणं घाईचं ठरेल. कारण प्रेक्षकांचा पाठिंबा असेपर्यंत चित्रपट हिटच राहतो. दुसऱ्या आठवड्यात फक्त २५ थिएटर्स मिळूनही आमचे कलेक्शन पहिल्या आठवड्यातील २५० थिएटर्सइतकेच होते.”

इमरान हाश्मीचा ‘आवारापन २’ आणि यशचा ‘टॉक्सिक’ या मोठ्या चित्रपटांना थिएटर मालकांनी प्राधान्य दिल्यामुळे, शो हाऊसफुल असूनही चित्रपट थिएटर्समध्ये टिकवून ठेवणं कठीण झालं होतं. “मोठ्या चित्रपटांच्या दबावामुळे आमचा चित्रपट काढला जात होता, त्यामुळे अडचण झाली होती,” असं विशाल चतुर्वेदी म्हणाले. त्यावर मात करण्यासाठी प्रॉडक्शन टीमने स्वतः रस्त्यावर उतरून गुजरातमधील सूरत, वडोदरा, अहमदाबाद, राजकोट, मोरबी आणि राजस्थानमधील जोधपूर, जयपूर, उदयपूरमधील विविध थिएटर्सना भेट देऊन चित्रपट पोहोचवला.