scorecardresearch

मी सरकारवर टीका करु शकत नाही का?- सोनम कपूर

मी नरेंद्र मोदींना मत दिलं की नाही याने काहीच फरक पडत नाही.

मी सरकारवर टीका करु शकत नाही का?- सोनम कपूर
सोनम कपूर

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही बॉलिवूडची दिवा म्हणून ओळखली जाते. पण त्याचसोबत विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठीही ती नेहमीच चर्चेत असते. बी-टाउनमधील इतर सेलिब्रिटींप्रमाणे सोनमसुद्धा अनेकदा टीकांना सामोरी गेली आहे. अशा या अभिनेत्रीने एका वृत्तपत्रातील ब्लॉगच्या माध्यमातून तिच्यावर टीका करणाऱ्यांना हटके स्टाइलने उत्तर दिलं आहे. सक्षमीकरणाचा संदेश देत सोनमने टीकाकारांवर निशाणा साधला आहे. यावेळी तिनं सरकारबद्दल तिचं मत मांडल असून सरकारवर टीका करण्याचा तिला पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले आहे.

तिने लिहिलंय की, पूर्वी लोक प्रश्न विचारायला घाबरत नव्हते. एखाद्या गोष्टीवर ते ठामपणे आपलं मत व्यक्त करू शकत होते. तसेच, राजकीयदृष्ट्या लोकांनी बरोबरच असायला हवं असं काही आपल्या देशात तेव्हा नव्हतं. आता आम्ही सरकारवर टीका करतोय म्हणून तुम्ही आमच्यावर हल्लाबोल कराल. मी सरकारवर टीका करू शकत नाही का? हीच लोकशाही आहे. मी नरेंद्र मोदींना मत दिलं की नाही याने काहीच फरक पडत नाही. आम्हाला प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. मला माझा देश आवडतो. पण, मी केवळ प्रश्न विचारते आणि टीका करते म्हणून तुमच्यासारख्या धर्मांध लोकांच्या नजरेत राष्ट्रविरोधी ठरते. तुम्हाला राष्ट्रगीत पुन्हा एकदा ऐकण्याची गरज आहे. लहान असताना तुम्ही एक ओळ म्हटली असेल, ‘हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई….’ आठवतंय.

सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांसाठीही सोनमने एक संदेश लिहिला आहे. सोशल मीडियाचा वापर करताना संवेदनशीलता फार महत्त्वाची असते. माध्यमांचा वापर करताना मी मवाळ भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी अधिक बुद्धिवान बनण्याची गरज आहे. अशा लोकांना ब्लॉक किंवा रिपोर्ट करणं माझ्यासाठी सहज सोपं आहे. पण, तुमची चूक उमगावी यासाठी तुम्हाला क्षमा करण्याइतपतही मी सक्षम आहे. धर्मांध विचारसरणीतून बाहेर पडा, या शब्दांमध्ये सोनमने टीकाकारांना खडसावले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-04-2017 at 17:28 IST

संबंधित बातम्या