छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं की तुमच्या माझ्या कुणाच्याही मनात येणारी पहिली भावना म्हणजे अभिमान. गर्वाने उर फुलून यावा असंच महाराजांचं कर्तृत्व. अभिनेता रितेश देशमुख याचा राजा शिवाजी हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होतो आहे. त्याचा ट्रेलर आला तेव्हाही उलटसुलट चर्चा रंगल्या आणि टिझरच्या वेळीही रंगल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत आहेत. तरीही त्यांच्या कलाकृतींवरुन वाद का होतो? असे कुठले चित्रपट आहेत ज्यावरुन वाद झाला होता? आपण या निमित्ताने जाणून घेऊ.

‘राजा शिवाजी’वरुन सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा

राजा शिवाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख आहे. हा चित्रपट १ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात विद्या बालन, संजय दत्त, बोमन इराणी, अभिषेक बच्चन, सचिन खेडेकर, जिनिलिया देशमुख, भाग्यश्री पटवर्धन अशी कलाकारांची फौज आहे. अजय-अतुल यांनी चित्रपटाचं संगीत केलं आहे. दरम्यान चित्रपटाचा टिझर आणि नंतर ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हापासून उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. रितेश देशमुख छत्रपतींच्या भूमिकेत शोभून दिसत नाही. जिनिलिया, भाग्यश्री यांची संवादफेक चांगली नाही. चित्रपटातली पात्रनिर्मिती नीट जमलेली नाही असे अनेक विषय काढले जात आहेत. ट्रेलर आणि टिझरचेही रिव्ह्यू केले जात आहेत. त्यातले काही नकारार्थी आहेत. काही होकारार्थी. त्यामुळे असा प्रश्न पडतोच की छत्रपती शिवाजी महाराजांवर होणाऱ्या कलाकृतींवर वाद का होतो? आपण अशा काही चित्रपटांबाबत जाणून घेणार आहोत ज्यावरुन वाद झाला होता.

‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटाचा वाद काय?

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटात सचिन खेडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. मध्यमवर्गीय माणूस त्याला हिणवलं जात असल्याने चिडलाय. शेवटी एकेदिवशी उद्विग्न होतो आणि छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, तसंच इतर महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर तो आपली व्यथा मांडतो. ज्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्याला दिसू लागतात. पुढे काय घडतं त्याला ताकद कशी मिळते? असा साधारण या सिनेमाचा विषय होता. या चित्रपटावर मनसेचा प्रचार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. तसंच सचिन खेडेकर यांनी म्हटलेला जो संवाद आहे त्यावरुनही काही प्रमाणात टीका झाली होती. मात्र पुढे हा वाद शमला.

हरहर महादेव चित्रपटावरुनही झाला होता वाद

हरहर महादेव हा चित्रपट २०२२ मध्ये आला होता. या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका सुबोध भावेंनी साकारली होती. या चित्रपटातल्या प्रसंगांवरुन आणि संवादांवरुन इतका वाद झाला होता की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाचा ठाण्यातील खेळ बंद पाडला होता. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे ही भूमिका शरद केळकर यांनी साकारली आहे. मात्र या चित्रपटातल्या प्रसंगांवर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला होता.

Har Har Mahadev Movie
हर हर महादेव चित्रपटावरुन नेमका काय वाद झाला होता? (फोटो-सोशल मीडिया)

हर हर महादेव सिनेमा मूळ इतिहासाला धरून नसल्याचा आरोप

मूळ इतिहासाला धरून हा सिनेमा नाही, त्यामुळे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जी दृश्यं दाखवण्यात आली आहेत तसे प्रसंग नाहीत हा मुख्य आक्षेप विविध संघटनांनी घेतला होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साम्राज्याला या सिनेमात मराठी साम्राज्य म्हटलं गेले आहे मात्र ते मराठा साम्राज्य आहे हा आक्षेप घेण्यात आला होता.

चित्रपटातल्या संवादांवर आक्षेप काय होते?

चित्रपटातील संवाद हे शिवकालीन वाटत नाहीत. अफझल खानाचा कोथळा काढताना खानाने छत्रपती शिवरायांच्या डोक्यावर वार केल्यानंतर येणाऱ्या रक्तस्रावाच्या प्रसंगावरही आक्षेप घेण्यात आला, हे दृश्य इतिहासाला धरून नाही असं अनेक संघटनांचं म्हणणं होतं.

बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवरायांसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी प्राण दिले त्यांच्या तोंडी महाराजांच्या प्रती आक्षेपार्ह वक्तव्यं टाकली आहेत. मला एकाचा जीव घ्यायचा आहे त्याच नाव आहे. शिवाजी शहाजी भोसले असा संवाद बाजीप्रभूंच्या तोंडी आहे आणि अशी मानसिकता असलेल्या माणसांवर विश्वास ठेवून महाराज स्वराज्यची अपेक्षा ठेवून होते असं निर्मात्यांना सांगायचं आहे का? असाही प्रश्न उपस्थित झाला होता.

खालिद का शिवाजी या चित्रपटावरुन झालेला वाद काय होता?

खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटावरून महाराष्ट्रात बराच गोंधळ झाला होता. यातला पहिला आक्षेप तर चित्रपटाच्या नावावरच घेण्यात आला होता. ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचा ट्रेलर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झाल्यानंतर बराच गोंधळ उडाला. चित्रपटाच्या २.३ मिनिटांच्या ट्रेलरने लोक संतापले होते.ट्रेलरमध्ये विदर्भातील वर्धा जिल्ह्यात राहणाऱ्या खालिद नावाच्या मुलाची कहाणी दाखवण्यात आली. चित्रपटात, खालिदला त्याचे वर्गमित्र अफजल खान असे म्हणत चिडवतात, जो शिवाजी महाराजांनी मारलेला आदिलशाहाचा सेनापती होता आणि महाराष्ट्रात त्याचा खूप द्वेष केला जात असे. ट्रेलरमध्ये एक पात्र असे म्हणताना ऐकू येते की, “खरा राजा तो असतो जो धर्मावर विश्वास ठेवतो आणि तो मी पाळत नाही.” “खरा राजा तोच असतो जो संपूर्ण जगाच्या धर्माचे पालन करतो.”

Khalid Ka Shivaji Movie Controversy
खालिद का शिवाजी या चित्रपटावरुनही वाद निर्माण झाला होता. (फोटो-सोशल मीडिया)

चित्रपटात खालिद नावाच्या एका पात्राला शिवाजी महाराजांच्या वेशात दाखवण्यात आलं. खालिद का शिवाजी चित्रपटाला विरोध करणाऱ्या हिंदू संघटनांचा आरोप आहे की चित्रपटाच्या निर्मात्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड केली आहे आणि ते चुकीच्या पद्धतीने सादर केलं. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही या चित्रपटावर टीका केली होती.

पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटावरुनही झाला होता वाद

पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाशी संबंधित वादाप्रकरणी एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपी या चित्रपट निर्मिती कंपनीने अभिनेता-निर्माता महेश वामन मांजरेकर यांच्यासह चित्रपटांच्या अन्य निर्मात्यांविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट २००९ मध्ये प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेन्मेट एलएलपी आणि महेश मांजरेकर यांनी संयुक्तपणे मेसर्स अश्वमी फिल्म्सच्या बॅनरखाली केली होती. तसेच, त्यात एव्हरेस्टकडे चित्रपटाचे ६० टक्के आणि महेश मांजरेकर यांच्याकडे ४० टक्के हक्क होते. पुढे, २०१३ मध्ये मांजरेकर यांनी ठराविक आर्थिक मोबदला घेवून त्यांचे ४० टक्के हक्क हे संपूर्णतः एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटला हस्तांतरित केले. त्यामुळे, एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट ही कंपनी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाशी संबंधित सर्व बौद्धिक संपदा हक्कांची एकमेव मालक बनली. त्यात प्रीक्वेल, सिक्वेल किंवा इतर मूळ विषयाशी संबंधित कलाकृती तयार करण्याच्या विशेष आणि एकाधिकार हक्कांचा समावेश आहे, असा दावा कंपनीने याचिकेत करण्यात आला होता. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाचा पुढील भाग किंवा भाग २ आहे, चित्रपटाचे नाव, लोगो आणि फलक डीझाइन या सर्व गोष्टी मूळ चित्रपटाशी साधर्म्य सांगणाऱ्या आहेत. त्याशिवाय, अनेक प्रसिद्धी मजकूर, मुलाखती आणि बातम्या यामध्ये देखील ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा उल्लेख २००९ च्या मूळ चित्रपटाचा ‘भाग २’ म्हणून करण्यात आल्याचे याचिकेत म्हटलं होतं. तसेच, हा प्रकार मूळ चित्रपटाच्या प्रतिष्ठेचा आणि लोकप्रियतेचा फायदा घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे, असा आरोप कंपनीने केला होता.

Poster From Movie Raja Shivaji
राजा शिवाजी चित्रपटातील एक प्रसंग (फोटो-रितेश देशमुख, इन्स्टाग्राम पेज)

ही सगळी उदाहरणं लक्षात घेतली तर महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांवर निर्माण करण्यात आलेल्या कलाकृतींवर वाद होतो हे दिसून आलं आहे. आता राजा शिवाजी चित्रपटाबाबतही उलटसुलट चर्चांचं गुऱ्हाळ रंगतं आहे. आधी चित्रपट प्रदर्शित होऊद्या त्यानंतर तो पाहून जर त्यावर भाष्य केलं तर बरं होईल. पण हल्लीच्या रिल्स पाहण्याच्या जमान्यात कदाचित तितका वेळ कुणाकडे नाही. त्यामुळे टिझर आणि ट्रेलवरुन चित्रपट चांगला की वाईट याची चर्चा होते आहे, ही बाब निश्चितच दुर्दैवी आहे.