१६ वर्षे भारतात वास्तव्य करणारी इराणी अभिनेत्री मंदाना करीमीने आता भारत देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर तिच्या निर्णयाची चर्चा होते आहे. मंदानाने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग च्या सेशन दरम्यान विमानतळावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने भारत देश सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भारत माझ्यासाठी माझ्या दुसऱ्या घरासारखा होता. पण आता या देशात घरासारखं काही राहिलेलं नाही असंही तिने म्हटलं आहे. ज्यानंतर सोशल मीडियावर मंदाना करीमी चर्चेत आली आहे. कोण आहे ही अभिनेत्री आणि तिने हा निर्णय का घेतला जाणून घेऊ.
नेमकं काय म्हटलं आहे मंदानाने?
मंदाना करीमाने इन्स्टाग्राम पेजवर लोकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. एका फॅनने तिला विचारलं की तुम्ही मुंबई कायमची सोडत आहात? तुम्हाला या शहराची आठवण येईल का? त्यावर मंदानाने व्हिडीओ पोस्ट केला आणि उत्तर दिलं. ती म्हणाली मी कधीही हा विचार केला नव्हता, तसंच ही कल्पनाही केली नव्हती… पण मी आता खरंच म्हणतेय गुडबाय इंडिया. माझ्यासाठी हा निर्णय घेणं कठीण होतं. मी भारतात १६ वर्षे वास्तव्य केलं. हा देश मला माझ्या दुसऱ्या घरासारखा होता. नवी सुरुवात करण्यासाठी मी तयार आहे. आता नवा देश, नवं घर सगळंच नवं. मंदानाने हे म्हणत देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच ती ट्रेंडमध्येही आली आहे.

मंदाना कुठल्या देशात जाणार?
मंदाना कुठल्या देशात जाणार? हे तिने स्पष्ट केलेलं नाही. पण ती तिचा मूळ देश म्हणजेच इराणला चाललेली नाही हे तिने सांगितलं आहे. मार्च महिन्यातच तिने हे सांगितलं होतं की मी इराणला जाणार नाही. इराणने १० वर्षांपूर्वी मंदानावर बंदी घातली होती. त्यामुळे तिने सांगितलं होतं की मी भारत सोडणार आहे हे नक्की आहे पण मी इराणला जाणार नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये मला भारतात कुणीही पाठिंबा दिला नाही. मी त्यामुळे भारतावर नाराज आहे. मी सुरक्षेच्या कारणास्तव एके ठिकाणी अडकले होते. मी आता कुठे आहे ते मात्र कुणालाही सांगणार नाही असंही मंदानाने म्हटलं होतं.
इराणबाबत तिने काय काय भूमिका घेतली होती?
मंदानाने असंही सांगितलं की माझ्या कठीण काळात मला भारतातल्या मित्रांनी, सरकारने, मीडियाने कुणीही मदत केली नाही. भारत देश आता मला घरासारखा वाटत नाही. मी इराणबाबत जी भूमिका मागच्या काही महिन्यांमध्ये मांडली त्यानंतर मला हळूहळू दूर सारण्यात आलं. त्यामुळे आता मी हा देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे असं मंदानाने म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवाई करत ठार केलं. ज्यानंतर मंदानाने आनंद व्यक्त केला होता. तसंच जे युद्ध सुरु होतं तेव्हा इराणच्या नागरिकांवर हल्ला तर होणार नाही ना? अशी चिंताही तिने व्यक्त केली होती. दरम्यान तिला याबाबत कुणीही पाठिंबा दिला नाही किंवा तिचं समर्थन केलं नाही. त्यामुळे आता ती भारतावर नाराज झाली आहे. मंदाना करीमी इराणमध्येच लहानाची मोठी झाली आहे. पण वयाच्या १८ व्या वर्षी तिने इराण सोडला. त्यानंतर ती भारतात आली. भारतात ती १६ वर्षे राहिली. पण आता तिने भारत घरासारखा वाटत नाही म्हणत हा देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अयातुल्ला खामेनी आणि इराणबाबत काय म्हटलं होतं मंदानाने?
इस्रायल आणि अमेरिका यांच्या संयुक्त हल्ल्यात अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. मंदाना तेव्हा म्हणाली होती तिथलं सरकार हे एखाद्या कर्करोगासारखंच होतं. त्यामुळे ४८ वर्षांपासून अनेकांचा लढा सुरु होता. इरामध्ये १९७९ पासून इस्लामिक रिपब्लिक सरकार आहे. भारतातले मुस्लिम लोक इराणला पाठिंबा देऊन खामेनी यांच्या मृत्यूनंतर निदर्शनं करत आहेत. त्याला काहीही अर्थ नाही. खामेनींचा मृत्यू झाला हे बरंच झालं असं विधान मंदानाने केलं होतं. त्यामुळे ती फेब्रुवारी महिन्यातही चर्चेत आली होती.

कोण आहे मंदाना करीमी?
मंदाना करीमी ही इराणची एक अभिनेत्री आहे. तसंच ती मॉडेल, रिअॅलिटी टीव्ही पर्सनॅलिटीही आहे.
बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही शो याद्वारे ती भारतात आली.
मंदाना करीमीने २०१० मध्ये मॉडेलिंग आणि करिअर करायला सुरुवात केली होती.
भाग जॉनी, रॉय आणि मै और चार्ल्स या चित्रपटांमध्ये मंदाना करीमीने अभिनय केला आहे.
नेटफ्लिक्सवर काही महिन्यांपूर्वी आलेल्या अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर यांच्या थार या चित्रपटातही मंदाना करीमीची भूमिका होती.
मंदाना करीमी बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
कंगना रणौतने होस्ट केलेल्या लॉक अप या रिअॅलिटी शोमध्येही मंदाना करीमी झळकली होती.
मंदाना करीमीचा जन्म १९ मे १९८८ ला इराणच्या तेहरानमध्ये झाला. मंदाना करीमीचं कुटुंब इराणी मुस्लिम आहे. २०१० मध्ये मंदाना मुंबईत आली. त्याआधी तिने एअर होस्टेस म्हणूनही काम केलं होतं.
