Met Gala 2026 Ticket Price, Theme & Streaming Details : जगातील सर्वात ग्लॅमरस फॅशन इव्हेंट ‘मेट गाला २०२६’ ४ मे रोजी सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वेगळे आणि हटके फॅशन, आउटफिट पाहायला मिळत आहे. ‘मेट गाला २०२६’ची यावर्षीची थीम कॉस्च्युम आर्ट(Costume Art) आहे आणि ड्रेस कोड फॅशन इज आर्ट (Fashion Is Art) असा आहे. या थीमनुसार सेलिब्रिटी आपल्या कपड्यांमधून कला आणि इतिहास दाखवतात. त्यामुळे इथे वेगवेगळे आणि कधी कधी खूपच अनोखे आउटफिट्स पाहायला मिळतात.
भारतामधून कोणी घेतला सहभाग?
‘न्यूज १८’च्या माहितीनुसार, यावर्षी या इव्हेंटमध्ये ईशा अंबानी, नताशा पुनावाला, मनीष मल्होत्रा, करण जोहर, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांसारख्या मोठ्या कलाकारांनी सहभाग घेण्याची शक्यता वर्तवली होती. आता यातील करण जोहर, मनीष मल्होत्रा आणि ईशा अंबानी यांच्या हटके आणि डिझायनर आउटफिटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यांच्यासह इतरही अनेक भारतीयांनी वेगवेगळे आउटफिट परिधान करत या कार्यक्रमात हजेरी लावली. मात्र, यावर्षी प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या इव्हेंटचा भाग नसतील, अशा काही बातम्या समोर येत आहेत. पण याबाबत अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही.
भारतात कुठे आणि कधी पाहता येईल हा कार्यक्रम
हा कार्यक्रम न्यूयॉर्कमधील ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’ येथे होत आहे. तुम्ही हा कार्यक्रम ‘वोग’च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर, तसंच यूट्यूब आणि टिक टॉकवर लाईव्ह पाहू शकता. याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनेल्स आणि सोशल मीडियावरही तो पाहायला मिळेल. ‘मेट गाला’ न्यूयॉर्कच्या वेळेनुसार सायंकाळी सुमारे ६ वाजता सुरू होतो. भारत आणि न्यू यॉर्क यांच्यात साधारण ९.५ तासांचा फरक असल्यामुळे भारतात हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी पहाटे सुमारे ३:३० वाजता पाहता येतो. याच वेळेला रेड कार्पेटची सुरुवात होते, जिथे सेलिब्रिटी खास आणि वेगळ्या कपड्यांमध्ये दिसतात. फॅशन आवडणाऱ्यांसाठी हा क्षण खूप खास असतो.
एका तिकीटासाठी मोजावी लागते मोठी किंमत
‘मेट गाला’ हा जगातील सर्वात महागड्या इव्हेंट्सपैकी एक मानला जातो. ‘बीबीसी’च्या माहितीनुसार, याच्या एका तिकीटाची किंमत सुमारे ७५,००० डॉलर डॉलर म्हणजेच जवळपास ६० लाख रुपये असते. तर एक टेबलची किंमत सुमारे ३.५ लाख डॉलर म्हणजेच जवळपास 3 कोटी रुपये असते. मात्र, बहुतेक सेलिब्रिटी स्वतः पैसे देत नाहीत. फॅशन ब्रँड्स त्यांना आमंत्रित करतात. यामुळे त्या ब्रँड्सचा यामुळे प्रचार होतो, कारण त्यांच्या कपड्यांची चर्चा संपूर्ण जगभर होते.
काय आहे मेट गाला?
‘मेट गाला’ हा एक मोठा फॅशन आणि फंडरेझिंग इव्हेंट आहे, जो दरवर्षी न्यूयॉर्क येथे आयोजित केला जातो. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश वेशभूषा संस्थे(Costume Institute) साठी निधी जमा करणे हा आहे. या इव्हेंटमध्ये साधारण ४०० ते ४५० मोठे सेलिब्रिटी सहभागी होतात. रेड कार्पेटवर हे सेलिब्रिटी वेगवेगळ्या आणि खास डिझाइन केलेल्या कपड्यांमध्ये दिसतात, ज्यामुळे हा कार्यक्रम फॅशनसाठी खूप खास मानला जातो.
