पहिल्या सिझनमध्ये रॉ एजंटची भूमिका साकारणारी राधिका आपटे ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये नव्हती. पहिल्या सिझनमधील अनेक कलाकार दुसऱ्या सिझनमध्ये असताना केवळ राधिका आपटेच का नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्यावर आता राधिकाने उत्तर दिलं आहे. दुसऱ्या सिझनमध्ये तिची भूमिका का नव्हती याचा उलगडा तिने केला आहे.
काही दिवसापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये राधिकाने ‘सेक्रेड गेम्स २’ विषयी अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यासोबतच तिने या दुसऱ्या सिझनचा भाग का नव्हती, याचा खुलासाही केला. ‘सेक्रेड गेम्स २ मध्ये तुझी भूमिका का नाही’?, असा प्रश्न राधिकाला विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना तिने त्यामागचं कारण सांगितलं.
”सेक्रेड गेम्स’च्या पहिल्या भागामध्ये मी रॉ एजंट अंजली माथुर हिची भूमिका साकारली होती. या पहिल्या भागामध्येच अंजली माथुरचा मृत्यू झाल्याचं दाखविण्यात आलं आहे. त्यामुळेच दुसऱ्या सिझनमध्ये माझी भूमिका नाहीये. परंतु अंजली माथुर साकारताना मला विशेष मज्जा आली”, असं राधिकाने सांगितलं.
दरम्यान, ‘सेक्रेड गेम्स’चा पहिला सिझन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरला होता. मात्र त्याच्या तुलनेत ‘सेक्रेड गेम्स २’ हा प्रेक्षकांना फारसा भावलेला दिसत नाही. या नव्या सिझनमध्ये कल्की कोचलीन, पंकज त्रिपाठी, सैफ अली खान हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.