…म्हणून शाहरुख पाकिस्तानात जाणार?

शाहरुख नेहमीच विविध कारणांनी काही, काही वादांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. अनेकदा त्याच्यावर काही नेटकऱ्यांचा रोषही ओढावतो.

Shah Rukh Khan
शाहरुख खान, Shah Rukh Khan

सोशल मीडियावर ट्रोल होणाऱ्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे शाहरुख खान. शाहरुख नेहमीच विविध कारणांनी काही, काही वादांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. अनेकदा त्याच्यावर काही नेटकऱ्यांचा रोषही ओढावतो. सध्या हा किंग खान चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या चुलत बहिणीमुळे. शाहरुखची चुलत बहीण नूर जहाँ पाकिस्तानातून निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त समोर आलं आणि पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी किंग खानला निशाण्यावर घेतलं.

शाहरुखची बहीण नूर जहाँ पाकिस्तानच्या पेशावर प्रांतातून निवडणूक लढवणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. याच चर्चेने अनेकांचं लक्ष वेधलं. मुळात याविषयीच्या चर्चा रंगण्यामागचं मुख्य कारण होतं ते म्हणजे नूर जहाँ आणि शाहरुखचं नातं. पण, या चर्चांना वेगळं वळण तेव्हा मिळालं, जेव्हा शाहरुखच्या देशप्रेमावरच काही नेट युजर्सनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काहींनी तर शाहरुखचा फोटो आणि पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचा फोटोचा कोलाज करत ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

इतकच नव्हे तर आयपीएल सामन्यांमध्ये केकेआरच्या संघात खेळाडूंची निवड करणं असो किंवा ‘रईस’ चित्रपटात त्याने पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबत स्क्रीन शेअर करणं असो. प्रत्येक गोष्टीशी पाकिस्तानचं नाव जोडत नेटकऱ्यांनी या ना त्या मार्गाने शाहरुखवर तोफ डागली, अनेकांनी तर तो आता पाकिस्तानमध्ये जाणार का, असा प्रश्नही उपस्थित केला. नेकऱ्यांच्या या प्रश्नांना आता किंग खान काही उत्तरं देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचा : …म्हणून आलिया- रणबीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार नाहीत

दरम्यान, शाहरुखची बहीण नूर जहाँ खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पीके-७७ या मतदार संघातून निवडणूक लढणार आहे. मुळच्या पेशावरच्या मोहल्ला शाह वाली कतल येथून तिने आपल्या निवडणूक अभियानाची सुरुवात केली होती. तिला हे राजकीय विश्व काही नवं नाही. शेजारी आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेकांचं समर्थन तिला मिळालेलं आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणूकांसाठी ती प्रचंड आशावादी आहे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Will srk go to pakistan asks twitterati bollywood actor shah rukh khan gets trolled as cousin noor jehan contests elections in peshawar