नव्वदच्या दशकात स्त्रीमुक्तीपासून सुरू झालेला वैचारिक प्रवास स्त्री-पुरुष समानतेच्या विचारापर्यंत येऊन पोहोचला होता; पण वास्तवात तो स्त्रियांनी कसा स्वीकारला? हा विचार मांडत आपल्या आयुष्यातील निर्णय खंबीरपणे घेणाऱ्या आणि आपल्या विचारांशी ठाम राहणाऱ्या ‘चारचौघीं’ची कथा रंगवणारं नाटक १९९१ साली रंगभूमीवर आलं. त्या दशकातील ते महत्त्वाचं नाटक ठरलंच, पण आजपावेतो या नाटकाला रसिकांच्या मनात कायम जागा मिळाली आहे. ३१ वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेलं आणि मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेलं ‘चारचौघी’ हे नाटक आता नव्या संचात दाखल झालं आहे.

तीन दशकांपूर्वी ‘श्री चिंतामणी’ या नाटय़संस्थेद्वारे सादर झालेल्या प्रशांत दळवीलिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ नाटकात दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर आणि आसावरी जोशी यांच्या भूमिका होत्या. प्रचलित विचारचौकटीला झुगारून देणाऱ्या या चारचौघींनी तत्कालीन समाजमनाला घुसळून काढले होते. समाजाला नातेसंबंधांवर विचार करायला प्रसंगी भाग पाडले होते. या नाटकाचे हजारोंच्या घरात प्रयोग झाले. आता नव्याने ‘जिगीषा नाटय़संस्थे’ने हे नाटक प्रेक्षकांसमोर आणले आहे. या नाटकात रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे व पार्थ केतकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. शनिवारी दीनानाथ नाटय़गृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. गेल्या काही वर्षांत नाटय़ व्यवसायाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याचा अनुभव फारसा येत नाही. ‘चारचौघी’च्या शुभारंभाच्या प्रयोगांसाठी मात्र लोकांनी सकाळी सकाळी रांगा लावून तिकिटे विकत घेतली. हा अनुभव खूप सुखावणारा होता, अशी माहिती नाटकाचे निर्माते श्रीपाद पद्माकर यांनी दिली.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
jayant patil govinda eknath shinde
“चालणारा नट…”, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “त्यांचा शेवटचा चित्रपट…”

‘चारचौघी’ या नाटकाबाबत बोलताना दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणतात, ‘‘हे एक चर्चानाटय़ आहे. आपल्या हक्कांसाठी, स्त्रियांच्या जाणिवांचे हक्काचे जे लढे तेव्हा सुरू होते, त्यातला प्रचाराचा भाग न घेता त्यातल्या मानवी व्यक्तिरेखा व आशय घेऊन हे नाटक लिहिले गेले होते. हे नाटक आता ३१ वर्षांनंतरच्या काळातही सार्वकालिक वाटते. पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर आले याचा आनंदच आहे.’’ तर या नाटकाचे लेखक प्रशांत दळवी यांनीही नाटक नव्या कलाकारांना घेऊन पुन्हा रंगभूमीवर आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘‘इतक्या वर्षांत अनेक पिढय़ा बदलल्या आहेत. आजची तरुण पिढी या नाटकाकडे कसे पाहते हे जाणून घेण्याची एक लेखक म्हणून मला उत्सुकता आहे. ज्या जुन्या पिढीने हे नाटक पाहिले आहे त्यांच्या पूर्वस्मृती जाग्या होतील आणि नव्या पिढीला नव्याने हे नाटक समजेल,’’ अशी भावना दळवी यांनी व्यक्त केली. हे नाटक महाराष्ट्रातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे आहे, असे सांगतानाच हे नाटक पाहिलेल्या जुन्या पिढीलाही नवीन संचात नाटक पाहण्याची उत्सुकता असल्याचे निर्माते श्रीपाद पद्माकर यांनी सांगितले.