World Music Day 2018 : आपल्या भारतीय संस्कृती, सभ्यता, परंपरा, मूल्ये यांच्या अनेक वैशिष्ट्यांतील एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, गीत, संगीत आणि नृत्य. फिल्मी म्हणजेच हिंदीसह देशातील सर्वच प्रादेशिक चित्रपट आणि गैरफिल्मी संगीत अर्थात चित्रपटाव्यतिरिक्त अनेक प्रकारचे संगीत हे आपले खास वैशिष्ट्य. जगभरात विविध प्रकारच्या संगीताचा प्रवास, प्रवाह, प्रगती सुरुच असते, सगळीकडे सातच सूर आहेत आणि ग्लोबलायझेशनच्या युगात हा संगीताचा प्रभाव देश व धर्म यांच्या सीमा ओलांडून वाहतो आहे.

आपल्या चित्रपट संस्कृतीत या संगीत कलेला जन्मापासूनच स्थान. याचे कारण आपल्या चित्रपटावरचा सुरुवातीचा संगीत नाटकाचा प्रभाव व आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात बारशापासून विविध सणात असलेले गीत संगीत नृत्याचे स्थान. याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रभाव पहिल्या बोलपटापासूनच पडला. ‘अयोध्येचा राजा ‘( १९३२) या आपल्या पहिल्याच बोलपटात पंधरा गाणी होती आणि दिग्दर्शक- संकलक व्ही.शांताराम यांनी ती पटकथेच्या ओघात साकारली. पूर्वीच्या अनेक चित्रपटात दहापेक्षाही जास्त गाणी असणे आणि ती जवळपास सर्वच श्रवणीय असणे ही जणू सामान्य गोष्ट असे. गाण्याशिवाय चित्रपट ही संकल्पना कालांतराने आली तेव्हा पार्श्वसंगीत महत्त्वपूर्ण ठरले. पण व्ही.शांताराम, राज कपूर, विजय आनंद, राज खोसला, गुरुदत्त त्याप्रमाणेच मनोजकुमार, सुभाष घई, संजय लीला भन्साली यांच्या चित्रपटातील गाणे ‘पाहणे’ कायमच सुखद अनुभव राहिलाय. याचे कारण ते नृत्य दिग्दर्शकाकडे गाणे सोपवून सेटबाहेर खुर्ची टाकून बसत नसत. ते स्वतः गाण्याचा दृश्यसौंदर्यात लक्ष घालत. ‘अलबेला’चे ‘भोली सुरत दिल के खोटे’ गाण्यावर प्रेक्षक जागा सोडून पडद्यासमोर नाचत. अनेक चित्रपटांच्या आवडत्या गाण्यावर पडद्यावर पैसे उडवणे ही आपली जगावेगळीच संस्कृती होती. चित्रपट गीत संगीत नृत्याने समाजाचे भावविश्व व्यापलंय. विजय आनंदने ‘गाईड ‘मध्ये ‘मोसे छल जी हरा व क्या से क्या हो गया’ ही तर राज कपूरने ‘घे घे रे सायबा’ व ‘झूठ बोले कव्वा काटे’ ही दोन गाणी चित्रपटात लागोपाठ ठेवूनही प्रेक्षकांनी ती स्वीकारलीत. याचे कारण हीच आपल्या देशातील चित्रपटाची खासियत आहे.

पूर्वी रेडियो हेच गाणे ऐकण्याचे एकमेव माध्यम होते. लग्न, बारसे, सण यात लाऊड स्पीकर जोरजोरात गाणी ऐकवून आपले नाव सार्थ करे पण ते रोज कसे असेल? दक्षिण मुंबईतील इराणी हॉटेलमधील ज्यूक बॉक्समध्ये दहा पैशाचे नाणे टाकून आवडते गाणे ऐकायचे. आपले गाणे येईपर्यंत इतरही गाणी ऐकून होत. सत्तरच्या दशकात आठ आण्यात एक गाणे होते हे आठवतयं. पानवाला व सलून हीच दोन गाणी ऐकण्याची हुकमी स्थाने होती. इतकी मर्यादित माध्यमे असल्यानेच फक्त आणि फक्त गाणी ऐकण्या, पाहण्यासाठी सिनेमाला जाणे होई. बैजू बावरा, फागुन, गुंज उठी शहनाई असे संगीतप्रधान चित्रपट कायमस्वरुपी लोकप्रिय राहिलेत. याचे कारण दूरदर्शन, टेपरेकॉर्डर, उपग्रह वाहिन्या अशी माध्यमे वाढताना त्यासह जुनी असंख्य गाणी पुढील पिढीत आली. मोबाईल कॉलर ट्यून, रिंग टोन आणि मग युट्यूब यातून संगीत फोफावले. गीत संगीत नृत्याने भरलेला ‘हम आपके है कौन ‘ सुपर हिट होतानाच आपल्या लग्न संस्कृतीला जणू इव्हेंट्सचे स्वरूप येतानाच नृत्यही विकसित झाले. मुलीचा पिता लग्नात नाचायलाच हवा. सोनम कपूरच्या लग्नात अनिल कपूर नाचला तसेच खेड्यापाड्यातील लग्नात नाचो संस्कृती खोलवर रूजलीय.

‘लगान’ला ऑस्करसाठी पाठवले तेव्हा या संगीतमय चित्रपटाचा तेथे निभाव तो काय लागणार म्हणत अनेकांनी भुवया उंचावल्या. पण हीच आपली चित्रपट संस्कृती आहे यावर आशुतोष गोवारीकर ठाम राहिला आणि ‘लगान’ला विदेशी चित्रपटात नामांकन मिळाले. पूर्वी अनेक सिंगल स्क्रीन थिएटरची साऊंड व्यवस्था साधारण स्वरुपाची असूनही प्रेक्षक गाण्यात रमत. ‘शोले’ने स्टीरिओफोनिक साऊंड आणला व चित्रपटाचा वेगळाच फिल येऊ लागला. वेगळ्या भाषेत सांगायचे तर ‘शोले’त संगीत खच्चून भरल्याचा प्रत्यय प्रत्येक दृश्यात येई. गब्बर सिंगच्या एन्ट्रीचा म्युझिक पिसही शहारून टाके. ‘मैने प्यार किया ‘ने फोर ट्रॅक आणत एक पाऊल पुढे टाकले. पुढे मल्टिप्लेक्स युगात डॉल्बी आणले. पण चित्रपट संगीतातील गोडवा कमी झाला तरी बाथरुम सिंगर खूप आहेत. पिकनिकला गाण्याच्या भेंड्या हुकमी झाल्यात. उपग्रह वाहिन्यांवर गीत नृत्याच्या कार्यक्रमांची वाढती संख्या व सातत्य देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकाना संधी देतेय. मूळ गाण्यात रिमिक्स केव्हाच रुजलय. जुन्या चित्रपटातील गाणी चाल बदलून, बिघडवून नवीन चित्रपटात येऊ लागलयं. रिक्षा, ट्रक व बार यातून गाणी वाहत असतातच. अधूनमधून सहज गुणगुणलो तरी आपल्याला रिलीफ मिळतोय. आजारपणात संगीत ऐकणे हितकारक असाही निष्कर्ष काढला गेलाय. ‘सैराट’च्या झिंगाट गाण्यावर पडद्यासमोर नाचत अनेकांनी आनंद मिळवत क्षीण हलका केला. अनेक चिंता, विवंचना, तणाव यावर आवडते गाणे ऐकणे, गुणगुणते जणू एक डोस आहे. संगीताने सगळेच विश्व व्यापलेय, त्यातले काही सूर आळवलेत.