World Biggest Flop Film Desert Warrior: आजकाल चित्रपटांचे बजेट झपाट्याने वाढत आहे. भारतात ‘वाराणसी’ व ‘रामायण’सारखे १००० ते ४००० कोटींचे चित्रपट बनत आहेत, तिथे हॉलीवूडसह इतर अनेक देशांमध्ये मोठ्या बजेटचे चित्रपट प्रचंड कमाई करत आहेत. असाच एक मोठा प्रयोग सौदी अरेबियाने केला. त्यांनी १४०० कोटी रुपये खर्च करून एक भव्य चित्रपट बनवला. यामध्ये हॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांनाही घेतलं,पण मात्र हा चित्रपट आपल्या बजेटचा एक तृतीयांशही कमाई करू शकला नाही. या चित्रपटाच्या निर्मात्यांचं तब्बल ९९.६% नुकसान ठरलं. इतकंच नाही तर हा जगातील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला.

कोणता आहे हा चित्रपट?

नोव्हेंबर २०२१ मध्ये सौदी मीडिया ग्रुपच्या ‘MBC Studios’ ने ‘डेझर्ट वॉरियर’ (Desert Warrior) नावाच्या चित्रपटाची घोषणा केली होती. सौदी फिल्म इंडस्ट्रीला जागतिक ओळख मिळवून देणं हा यामागचा उद्देश होता. ‘राईज ऑफ द प्लॅनेट ऑफ द अॅप्स’ दिग्दर्शित करणारे रुपर्ट व्याट यांनी दिग्दर्शकनाची धुरा सांभाळली होती. चित्रपटात अँथनी मॅकीने ‘हंजला’ची भूमिका साकारली. ऑस्कर विजेत्या बेन किंग्सलेने सम्राट किसरा ही भूमिका केली. तर प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकन अभिनेता शार्लटो कोप्लेदेखील महत्वाच्या भूमिकेत होता. तर ब्रिटिश-सौदी अभिनेत्री आयशा हर्ट हिने ‘राजकुमारी हिंद’ची भूमिका साकारली. इतकी मोठी स्टारकास्ट आणि अफाट पैसा खर्च करूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरला.

‘डेझर्ट वॉरियर’ची कथा

सातव्या शतकातील अरबस्तानवर आधारित या चित्रपटाची कथा राजकुमारी हिंद (आयशा हार्ट) आणि सम्राट किसरा (बेन किंग्सले) यांच्यातील युद्धावर बेतलेली. या युद्धात प्रसिद्ध योद्धा हंजला (अँथनी मॅकी) राजकुमारीला मदत करतो. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी तिथल्या स्थानिक लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी सौदी अरेबियामध्ये एका आंतरराष्ट्रीय टीमला पाचारण करण्यात आलं होतं. यामुळे चित्रपटाच्या सेटवर दररोज ४०० ते ५०० लोक उपस्थित असायचे.

‘डेझर्ट वॉरियर’ बजेट आणि कलाकारांचे मानधन

आंतरराष्ट्रीय क्रू आणि सेटवरील दररोजच्या मोठ्या गर्दीमुळे ‘डेझर्ट वॉरियर’चे बजेट वाढून तब्बल १४०० कोटी रुपये झाले. २०२५ मध्ये झुरिच फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी, हा चित्रपट दोन वर्षांहून अधिक काळ ‘पोस्ट-प्रोडक्शन’मध्ये होता. एप्रिल २०२६ मध्ये तो आंतरराष्ट्रीय स्तरावर रिलीज करण्यात आला, पण चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि तो फ्लॉप ठरला.

डेझर्ट वॉरियरचे ओपनिंग कलेक्शन

चित्रपटाचे बजेट जितके जास्त होते, तितकीच त्याच्याकडून कमाईची अपेक्षा होती. मात्र, केवळ अमेरिकाच नाही तर सौदी अरेबियामध्येही ‘डेझर्ट वॉरियर’ला चांगली ओपनिंग मिळाली नाही. उत्तर अमेरिकेतील १०१० चित्रपटगृहांमधून या चित्रपटाने केवळ ४ लाख ७२ हजार डॉलर्स कमावले, जी एका मोठ्या चित्रपटासाठी अत्यंत वाईट कामगिरी आहे.

सौदी अरेबियात पहिल्या आठवड्यात निराशाजनक कामगिरीमुळे हा चित्रपट कमाईच्या बाबतीत आठव्या क्रमांकावर राहिला आणि तिथे केवळ ८७ हजार डॉलर्सची कमाई झाली. संपूर्ण मध्य-पूर्व भागातून या चित्रपटाने १ लाख ४० हजार डॉलर्सपेक्षाही कमी कमाई केली. जगभरातून या चित्रपटाने केवळ ६ लाख ६५ हजार डॉलर्स (६ कोटी रुपये) कमावले.

सुरुवातीच्या दोन आठवड्यांतील अत्यंत वाईट कामगिरीनंतर हा चित्रपट चित्रपटगृहांमधून काढून टाकण्यात आला. या चित्रपटाने आपल्या एकूण बजेटच्या ०.४ टक्क्यांपेक्षाही कमी कमाई केली. परिणामी, निर्मात्यांचे ९९.६ टक्के नुकसान झाले. आतापर्यंत बनलेल्या कोणत्याही मोठ्या चित्रपटापैकी हा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला.