सध्या चित्रपटविश्वामध्ये चर्चेत असणारा विषय आहे तो म्हणजे ऑस्कर पुरस्कारांचा. अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या प्रत्येक बातमीवर सध्या अनेकांच्याच नजरा आहेत. मानाचा ऑस्कर कोणाला मिळणार याबाबतच्या चर्चा रंगत असतानाच बी टाऊनमध्येही दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला जाण्याविषयीच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या हॉलिवूड पदार्पणातच आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडण्यात यश मिळवले आहे. विन डिझेलसोबत ‘xXx: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटामध्ये काम करत दीपिकाने अनेकांनाच तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची भुरळ घातली होती. भारतात तिच्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरीही जागतिक स्तरावर मात्र तिच्याच चित्रपटाची चर्चा सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपिकाच्या पहिल्याच हॉलिवूडपटाला मिळालेले यश आणि तिची लोकप्रियता पाहता यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दीपिकाचीही अदा पाहायला मिळणार असेच सर्वांना वाटत होते. पण, यासंबंधीचाच एक प्रश्न ज्यावेळी तिला विचारण्यात आला तेव्हा तिचे उत्तर अनेकांना अनपेक्षित होते. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दीपिकाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ‘xXx: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल दीपिकाने प्रेक्षकांचे आभार मानले. याचदरम्यान आपण ऑस्कर पुरस्कारांसाठी जाणार नसल्याचेही तिने स्पष्ट केले. यावेळी दीपिकाने तिच्या चित्रपटांविषयी उठणाऱ्या अफवांविषयीसुद्धा काही बाबी स्पष्ट केल्या. ‘मी मिस्टर अॅण्ड मिसेस स्मिथ या चित्रपटात मी काम करत नाहीये. मी जर कोणत्या चित्रपटात काम करत असेन तर मी त्याबद्दल नक्कीच बोलेन’, असेही दीपिका म्हणाली.

दरम्यान, दीपिका पदुकोण, विन डिझेल आणि सहकलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत केलेल्या कमाईचे आकडे पाहता हा चित्रपट २०१७ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. दीपिकाच्या या पहिल्यावहिल्या हॉलिवूडपटाने ‘फिफ्टी शेड्स डार्कर’ या चित्रपटाला मागे टाकत जॅकी चॅन यांच्या ‘कुंग फू योगा’ या चित्रपटावरही मात केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xxx fame deepika padukone is not attending oscars
First published on: 24-02-2017 at 14:14 IST