scorecardresearch

भन्नाट! ‘वाय’चा विशेष शो आयोजित करून मुलीचा नामकरण विधी, नाव ठेवलं…

सोशल मीडियावर सध्या या चिमुकलीची जोरदार चर्चा आहे.

y film, y film special screening, mukta barve, mukta barve fan, वाय चित्रपट, वाय स्पेशल स्क्रिनिंग, मुक्ता बर्वे, मुक्ता बर्वे चाहते, मुक्ता बर्वे चित्रपट
कोल्हापूरमधील सई राजेशिर्के देशमाने आणि मनोज देशमाने या जोडप्याने आगळयावेगळया पद्धतीने आपल्या मुलीचा नामकरण विधी केला.

एखादा सामाजिक विषय असलेला चित्रपट प्रदर्शित व्हावा आणि त्याचे सकारात्मक पडसाद उमटावेत, याहून आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. ज्या हेतूने चित्रपटाची निर्मिती केली आहे, तो उद्देश साध्य होणे, हे एखाद्या नामांकित पुरस्कारापेक्षाही मोठे आहे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजित वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ हा हायपरलिंक चित्रपट. स्त्री भ्रूण हत्या या गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या ‘वाय’ने अनेक स्त्रियांना या संवेदनशील विषयावर पुढे येऊन बोलण्यास प्रोत्साहन दिले. अनेक महिला प्रेक्षकांनी आपले अनुभव ‘वाय’च्या टीमसोबत शेअर केले. अशा प्रतिक्रिया येत असतानाच आता कोल्हापूरमधील सई राजेशिर्के देशमाने आणि मनोज देशमाने या जोडप्याने या चित्रपटाने प्रेरित होऊन आगळयावेगळया पद्धतीने आपल्या मुलीच्या नामकरण विधी करण्याचे ठरवून त्यानिमित्ताने त्यांनी ‘वाय’चा एक खास शो कोल्हापूरमध्ये आयोजित केला होता.

या शोच्या दरम्यान थिएटरमध्येच त्यांनी नामकरण विधीही घडवून आणला. मोठमोठे हॉल घेऊन थाटामाटात मोठा समारंभ साजऱ्या करणाऱ्या युगात एखाद्या थिएटरमध्ये आपल्या मुलीचे बारसे करणे आणि ‘वाय’ सारखा चित्रपट यावेळी दाखवून मौल्यवान संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न करणे, हा नक्कीच कौतुकास्पद प्रयोग आहे. विशेष बाब म्हणजे या वेळी देशमाने जोडप्याने आपल्या मुलीचे नाव ‘मुक्ता’ ठेवले. एखाद्या चित्रपटाने प्रभावित होऊन, हा विषय जास्तीसजास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी बारशाचे असे आयोजन करणे, हे असे बहुदा पहिल्यांदाच घडले असावे. हा विषय असा आहे की, तो घराघरात पोहोचणे खूप गरजेचे आहे. याचे गांभीर्य कळले तरच याबाबत जागरूकता निर्माण होऊ शकते आणि या जोडप्याचा नामकरण विधीच्या निमित्ताने हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.

आपल्या मुलीचा नामकरण विधी अशाप्रकारे साजरा करण्याबाबत आई सई राजेशिर्के – देशमाने म्हणतात, ” लग्नाच्या दहा वर्षांनंतर आम्हाला कन्यारत्न झाले आणि याचा आम्हाला आनंदच आहे. यापूर्वी मुलगाच हवा, वंशाचा दिवाच हवा, ही अशी वाक्ये मी स्वतः अनुभवली आहेत. ‘वाय’च्या कथेत आणि माझ्या आयुष्यात खूप साम्य आहे. त्यामुळे आम्ही ‘मुक्ता’चे बारसं अशा पद्धतीने करण्याचे ठरवेल. मिष्टान्नांची मेजवानी तर असतेच मात्र ही आमची वैचारिक आणि समाज प्रबोधनात्मक मेजवानी आहे. हा चित्रपट पाहून मुलगी म्हणजे ओझे मानणाऱ्या लोकांच्या मानसिकतेत थोडा जरी फरक पडला, तर आमचा हेतू साध्य झाल्याचा आम्हाला आनंद होईल. असे चित्रपट बनायला हवेत आणि मुख्य म्हणजे असे चित्रपट प्रेक्षकांनी पाहायला हवेत”.

वडील मनोज देशमाने म्हणतात, ”आम्हाला सुरुवातीपासूनच मुलगी व्हावी, असे मनापासून वाटत होते. आज ‘मुक्ता’च्या निमित्ताने आमची ही इच्छा पूर्ण झाली. आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजतो की आमच्या पोटी मुलीने जन्म घेतला. आमच्या मुलीचे नाव मुक्ता ठेवण्याचे कारण हे की, मुक्ता म्हणजे मुक्त, जिला कसलंही बंधन असू शकत नाही. आणि हा विचार प्रत्यक्षात उतरावा, लोकांपर्यंत पोचावा म्हणून असा निर्णय घेतला. त्याशिवाय आणखी एक कारण म्हणजे ‘वाय’ मधील प्रमुख अभिनेत्री मुक्ता बर्वे. ती स्वतः एक उत्तम अभिनेत्री तर आहेच, ‘वाय’मधील तिचा धाडसीपणाही मनाला भिडणारा आहे. पण त्याहीपुढे जाऊन मुक्ताने स्वतःचे असे जे स्थान निर्माण केले आहे आणि त्यातून एक मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे, तो खरोखरच प्रेरणादायक आहे. आणि हा विचारही ‘मुक्ता’ नावामागे होता”. या आगळयावेगळया सोहळ्याबद्दल आणि त्यामागील इतक्या मोठ्या विचाराबद्दल या जोडप्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Y film special screening for daughter naming ceremony with mukta barve mrj