Yash Reaction on Toxic Movie Failure: कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट २६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती, त्यामुळे अॅडव्हान्स बुकिंगही दमदार झाले होते. मात्र, प्रदर्शनानंतर या चित्रपटाला प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. तसेच प्रेक्षकांकडून फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा चित्रपट चाहत्यांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला. चित्रपटासाठी डबिंग सुपरवायझर म्हणून काम केलेल्या जयदेव मोहन यांनी चित्रपटाच्या अपयशानंतर यशची नेमकी काय प्रतिक्रिया होती, याचा खुलासा केला आहे.

‘प्रजावाणी’ या युट्यूब चॅनेलवर बोलताना जयदेव यांनी ‘टॉक्सिक’च्या अपयशावर भाष्य केलं. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ३ लाखांहून अधिक पायरेटेड लिंक्स हटवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. यशने या चित्रपटासाठी आपल्या आयुष्याची ४ पेक्षा जास्त वर्षे दिली होती, त्यामुळे टीमला सिनेमा फ्लॉप झाल्याचं वाईट वाटतंय का? असं विचारल्यावर ते म्हणाले, “चित्रपट रिलीज झाल्यावर आमची भेट झालेली नाही, पण फोनवर दोनदा बोलणं झालं. मी या चित्रपटाचा एक खूप छोटा भाग आहे, पण प्रदर्शनाच्या दिवशी रिव्ह्यू आणि प्रतिक्रिया पाहून मी खूप भावुक झालो होतो. मला त्याचा फोन आला आणि तो म्हणाला, ‘फार काळजी करू नका. हे प्रेक्षकांवर सोडून द्या. ही त्यांची मर्जी आहे. पुढे आपल्याला बरंच काम करायचं आहे.’ पण त्याच्या बोलण्यातही मला त्रास स्पष्ट जाणवत होता.”

चित्रपट लोकांना समजला नाही, असं म्हणू शकत नाही – जयदेव

जयदेव यांनी सांगितलं की त्यांनीही आता प्रेक्षकांचा कौल स्वीकारला आहे. “चार वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली होती. मी पहिल्या ड्राफ्टची कथा ऐकली होती. शूटिंग संपेपर्यंत कथा बदलत जाते. हा चित्रपट कसा घडला हे मी पाहिलंय. पण ठीक आहे, शेवटी प्रेक्षक हेच सर्वस्व असतात. चित्रपट हिट-फ्लॉप होणं त्यांच्या आवडण्यावरच आहे. ‘आम्ही चांगला बनवला होता, पण लोकांनाच तो समजला नाही’ असं आम्ही म्हणू शकत नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, गीतू मोहनदासने ‘टॉक्सिक’चे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘टॉक्सिक’च्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी ५०० कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, २६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात निव्वळ २४७.२५ कोटी आणि जगभरात ३३८.५० कोटींची कमाई केली आहे. कन्नड आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये शूट केलेला हा चित्रपट सुरुवातीला सर्व दक्षिण भारतीय भाषा आणि हिंदीमध्ये प्रदर्शित झाला होता, तर ४ सप्टेंबर रोजी काही निवडक चित्रपटगृहांमध्ये तो इंग्रजीत प्रदर्शित करण्यात आला.