Toxic box office collection: ‘टॉक्सिक’ सिनेमा प्रदर्शित होण्याआधीपासूनच सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. दाक्षिणात्य सुपरस्टार यश व लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. २६ ऑगस्ट २०२६ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
टॉक्सिकला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पहायला मिळत आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊयात.
सिनेमाने पहिल्याच दिवशी नवीन विक्रम केला आहे. यशची प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाने पहिल्या दिवशी १०० कोटींचा आकडा पार केला आहे. जगभरात सिनेमाने १४० कोटींहून अधिक कमाई केली आहे. यश चार वर्षांपूर्वी ‘केजीएफ २’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चार वर्षांनंतर यश मोठ्या पडद्यावर परतला असून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी ‘जवान’ व ‘धुरंधर’सारख्या गाजलेल्या सिनेमांना मागे टाकले आहे. देशात पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘टॉक्सिक’ हा सिनेमा ठरला आहे.
सॅल्कनिकनुसार, ‘टॉक्सिक’ सिनेमाचे देशभरात २४,५७९ शो होते. सिनेमाने पहिल्याच दिवशी देशभरात १०१.१० कोटींची निव्वळ कमाई केली आहे. याआधी हा विक्रम पाच भारतीय सिनेमांनी केला आहे. ‘आरआरआर’नंतर ‘टॉक्सिक’ हा दुसरा सिनेमा आहे, जो सिक्वेल नाही.
१०० कोटींहून अधिक कमाई करणारे सिनेमे
‘पुष्पा २’ सिनेमाने १६४ कोटींची कमाई केली आहे. ‘आरआरआर’ सिनेमाने १३३ कोटींची कमाई केली आहे. ‘बाहुबली २’ने १२१ कोटींची कमाई केली आहे. ‘केजीएफ २’ने ११६ कोटींची कमाई केली आहे. ‘धुरंधर २’ने १०३ कोटींची कमाई केली आहे. ‘टॉक्सिक’ सिनेमाने १०१.१० कोटींची कमाई केली आहे.
हा सिनेमा मूळ कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. मात्र, ‘टॉक्सिक’ सिनेमा हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला आहे. हिंदी, कन्नड, तमिळ. तेलुगू, मल्याळम अशा विविध भाषांत हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी सिनेमातील तबाही हे गाणे प्रदर्शित केले होते. या गाण्यातील बोल्ड सीन पाहून अनेकांनी त्यावर टीका केली होती. यशने सिनेमा प्रदर्शित होण्याआधी एक मुलाखत दिली होती. त्यावेळी या ट्रोलिंगवर उत्तर दिले होते. आता पहिल्याच दिवशी सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असला तरीही आगामी काळात सिनेमा किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
