Yash On Toxic Tabahi Song Controversy: यशच्या ‘टॉक्सिक : अ फेरी टेल ऑन ग्रोन अप्स’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. २६ ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याआधीच निर्मात्यांनी सिनेमातील एक गाणे प्रदर्शित केले आहे.

कियारा अडवाणीचे तबाही हे गाणे निर्मात्यांनी रिलीज केले आहे. त्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काहींनी कौतुक केले; तर अनेकांनी त्यावर टीकाही केली आहे. काहींनी तर या गाण्याची तुलना कंडोमच्या जाहिरातीशी केली आहे. आता अभिनेता यशने त्याबाबत वक्तव्य केले आहे.

“कंडोमची जाहिरात करायची असेल तर…”

यशने नुकतीच ‘आप की अदालत’ या शोमध्ये हजेरी लावली होती. त्या शोमध्ये त्याला गाण्यावर टीका होत असल्याबद्दल, तसेच गाण्याची कंडोमच्या जाहिरातीबरोबर तुलना होत असल्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर यशने मजेशीर अंदाजात उत्तर दिले. तो म्हणाला, “जर कंडोमची जाहिरात करायची असेल, तर ती पैसे घेऊन करेन; फुकट करणार नाही”, यशचे उत्तर ऐकून सर्व जण हसत असल्याचे पाहायला मिळाले.

पुढे तो म्हणाला, “गोष्टी अश्लील असतील, तर त्या चुकीच्या आहेत. जर तुम्ही पाहिलं असेल, तर मी तर किसही केलेलं नाही. एक मर्यादा असते आणि आम्हाला ती माहीत आहे. सीनचं शूटिंग कौशल्यानं करावं लागतं. जो सीन आकर्षक वाटतो, तोच सिनेमाचा प्रभाव असतो.”

याआधी टॉक्सिक हा सिनेमा मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता; मात्र, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता २६ ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा इंग्रजी व कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. तसेच हा सिनेमा हिंदी, तमीळ, तेलुगु, मल्याळम या भाषांतही डब केलाही जाणार आहे. गीतू मोहनदास यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. KVN प्रॉडक्शन आणि मॉन्स्टर माईंड क्रिएशन्सने त्याची निर्मिती केली आहे.

तसेच, यशने या मुलाखतीत सिनेमातील बोल्ड सीन्सवर पत्नीची काय प्रतिक्रिया होती, याबद्दलही सांगितले. “कोणत्याही जोडीदाराला हे अस्वस्थ करू शकतं. पण, आम्ही सिनेसृष्टीत काम करतो आणि अभिनेता म्हणून मी ते काम करतो”, असे तो म्हणाला.

दरम्यान, आता यशचा बहुप्रतीक्षित टॉक्सिक हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.