Yash Toxic Movie Review in Marathi : ‘केजीएफ’ फेम रॉकस्टार यशच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण त्याचा बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक’ (Toxic) हा चित्रपट आज, २६ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘केजीएफ २’च्या प्रचंड यशानंतर तब्बल चार वर्षांनी यश मोठ्या पडद्यावर परतला आहे. टॉक्सिक हा एक हाय-व्होल्टेज गँगस्टर अॅक्शन ड्रामा चित्रपट असून त्याला सेन्सॉर बोर्डाकडून ‘A’ प्रमाणपत्र मिळाले आहे. टॉक्सिक चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये मोठी गर्दी करत आहेत. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी त्याचे एक्सवर रिव्ह्यू केले आहेत.
चित्रपटात यशबरोबर कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत अशी तगडी स्टारकास्ट आहे. चित्रपटाच्या ॲक्शन सीन्ससाठी हॉलिवूडच्या स्टंट कोरिओग्राफर्सची मदत घेण्यात आली आहे. ३ तास १२ मिनिटांच्या टॉक्सिकने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच चित्रपटाने ४० कोटींहून अधिकची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट कमाईचे अनेक नवीन विक्रम मोडण्याची दाट शक्यता असून, यशच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. टॉक्सिक चित्रपट कसा आहे, याबाबत प्रेक्षकांनी एक्सवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रेक्षकांना यशचा टॉक्सिक चित्रपट कसा वाटला? ते जाणून घेऊयात.
टॉक्सिकबद्दल प्रेक्षकांनी केलेल्या पोस्ट
चित्रपट इंटर्व्हलपर्यंत पोहोचलाय. आशा आहे की दुसऱ्या भागात काहीतरी जबरदस्त पाहायला मिळेल. वाट पाहतोय, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.
चित्रपटाचा पूर्वार्ध खिळवून ठेवणारा आहे. पात्रांची मांडणी उत्तम केली आहे. बहीण-भावामधील भावनिक प्रसंग मनाला भिडतात, संवाद प्रभावी आणि उत्तमरीत्या लिहिले गेले आहेत. तसेच, यशचा ‘स्वॅग’ व पडद्यावरील जबरदस्त वावर आणि ॲक्शन सीन तर अप्रतिम आहेत, अशी पोस्ट एका प्रेक्षकाने केली आहे.
जर टॉक्सिकची टक्कर मार्चमध्ये ‘धुरंधर’शी झाली असती, तर ‘धुरंधर’ पूर्णपणे आपटला असता. कोणीच तो चित्रपट बघायला गेलं नसतं. ‘Toxic’ खरोखरच तितका जबरदस्त आहे. यश आणि कियारा यांची केमिस्ट्री तर एकदम भन्नाट आहे. धुरंधरचे रेकॉर्ड्स टॉक्सिक सहज मोडेल, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.
‘Toxic’ फक्त वाईट नाही… तर डिझास्टर आहे. त्यात काहीच नीट नाही, कशाचाच ताळमेळ लागत नाही, अशी पोस्ट एका युजरने एक्सवर केली आहे.
हा चित्रपट म्हणजे सलग तीन तासांचा छळ आहे. पात्रांची योग्य ओळख करून न देताच कथेची सुरुवात होते, त्यामुळे सुरुवातीपासूनच कोणाशीही कनेक्ट करता येत नाही. तसेच दिग्दर्शन आणि लेखन वाईट दर्जाचे आहे. भव्य दृश्ये आणि तांत्रिकदृष्ट्या सिनेमा उत्तम असूनही, अत्यंत कंटाळवाणा वाटतो. कथालेखन आणि दिग्दर्शनात अजिबात दर्जा नाही. महत्त्वाची चार वर्षे वाया गेली, असं एका युजरने टॉक्सिक चित्रपटाबद्दल लिहिलंय.
