यशवंत देव यांना ‘आर. डी. बर्मन जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान
सध्याच्या गाण्यात शब्दच नाहीत आणि गाण्यात जर शब्दच नसतील तर त्याला गाणे कसे म्हणता येईल, असा परखड सवाल ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांनी मुंबईत प्रभादेवी येथे केला.
‘स्वरदा कम्युनिकेशन अॅण्ड इव्हेंट’ आणि ‘कॅनव्हास कम्युनिकेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने रवींद्र नाटय़ मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पहिला आर. डी. बर्मन जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांना आशा भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तेव्हा त्या बोलत होत्या. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शब्द हे गाण्याचा आत्मा तर चाल म्हणजे शरीर असते. त्यावर साजशृंगार चढविण्याचे काम गायक करतो. ‘मुन्नी बदनाम हुई’सारख्या अर्थहीन शब्द असलेल्या गाण्यांमुळे संगीताला धर्म राहिलेला नाही, अशी खंतही आशा भोसले यांनी या वेळी व्यक्त केली. यशवंत देव यांच्याकडून संगीताचे खूप बारकावे शिकले. आजही ‘आ’ आणि ‘सा’ लावताना त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करते. आवाज कसा लावायचा, तान कशी द्यायची याची शिकवणी देवांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना देव म्हणाले, आशा भोसले नुसत्या गात नाहीत तर गायलेले रसिकांपर्यंत पोहोचते की नाही ते बघतात तर शिंदे यांनी सांगितले, आर.डी. बर्मन व यशवंत देव हे दोघेही संशोधक संगीतकार असून त्यांनी नवनवीन प्रयोग करुन अनेक अजरामर गाणी रसिकांना दिली आहेत. पुरस्कार सोहळ्यानंतर ‘मॅजिकल पंचम’ ही बर्मन यांच्या गाण्यांची मैफल रंगली.