दहशतवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा केल्याप्रकरणी काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासीन मलिक याला दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने मलिक याला दहा लाखांचा दंडही ठोठावला. यासीन मलिकला बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यासह अन्य गुन्ह्यांत न्यायालयाने १९ मे रोजी दोषी ठरवले होत़े यासीनला फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) वकिलांनी केली होती़. या निकालानंतर श्रीनगरमधील काही नाकेबंदी करण्यात आली आहे. या निर्णयाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कौतुक केले आहे.

काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासीन मलिक याला दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर द कश्मीर फाइल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले आहे. त्यासोबत त्यांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत याबाबत सांगितले आहे. “ही फक्त सुरुवात आहे. जोपर्यंत यासिन मलिक आणि बिट्टाला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही न्याय हक्कासाठी आमचा लढा थांबवणार नाही”, असे त्यांनी ट्वीट करत म्हटले.

“फार उत्तम निर्णय. हा सर्व काश्मिरी हिंदूंसाठी आनंदाचा क्षण आहे. न्याय हक्कासाठी आमच्या मोहिमेतील एक मैलाचा दगड आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे. त्यासोबतच विवेक अग्निहोत्रींनी एक व्हिडीओही शेअर केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

यासीन मलिक हा जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख असून, २०१६ मध्ये काश्मीरमध्ये हिंसक आंदोलन घडविल्याचा ठपका ‘एनआयए’ने त्याच्यावर ठेवला होता़  या आंदोलनादरम्यान दगडफेकीच्या ६९ घटना नोंदविण्यात आल्या होत्या.  या प्रकरणी ‘एनआयए’ने मलिकच्या घरावर छापे घातले होत़े त्यात हिजबुल मजाहिद्दीनशी संबंधित काही कागदपत्रे सापडली होती. दरम्यान दहशतवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा केल्याप्रकरणी काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासीन मलिक याला दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

न्यायालयाच्या या निकालानंतर यासिन मलिकची रवानगी दिल्लीतील तिहार जेलमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे यासिन मलिकने या संपूर्ण प्रकरणात वकील घेण्यास नकार दिला होता. तसेच त्याच्यावरील आरोप कबुल केले होते.