२००७ मध्ये शांघाय येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये गौरीने मिळविलेल्या यशाबद्दलचा लेख दिग्दर्शक महेश लिमये, निर्माते उत्तुंग ठाकूर, रितेश देशमुख आदींच्या वाचनात आला होता. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. गौरीविषयी माहिती घेतली. तोपर्यंत चित्रपटात गौरी काम करणार आहे, हे आम्हालाही माहिती नव्हते. पण, महेश लिमये यांनी गौरीला जलतरण तलावावर पाहिले. जिच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे, त्यात तीच काम करेल आणि ते तिला जमेल, असा विश्वास महेश लिमये यांना वाटला आणि गौरीच्या जिद्दीची कहाणी ‘यलो’च्या रूपाने पडद्यावर आली. पण, जन्मत:च गतिमंद असलेल्या गौरीच्या जिद्दीची कहाणी तेव्हापासूनच सुरू झाली होती सांगताहेत.. गौरीच्या आई स्नेहा गाडगीळ..
विशेष मुलांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत गौरीने जलतरण या क्रीडा प्रकारात रौप्यपदक मिळविले असून गौरी सध्या पुण्यात स. प. महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिकत आहे. आणि आपल्याच आयुष्यावर असलेल्या या चित्रपटात स्वत: तिनेच भूमिका करेपर्यंतचा एक यशस्वी टप्पा तिने पूर्ण केला आहे.. याच टप्प्यावर स्नेहा गाडगीळ यांना आठवतो तो गौरीच्या जन्माचा क्षण..  पहिले अपत्य हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा ठेवा. पण, हा क्षण दु:ख, वेदना घेऊन आला तर तो धक्का पचविणे अवघड जाते. स्नेहा आणि शेखर गाडगीळ यांच्या बाबतीत तसेच घडले. या दोघांचे पहिले अपत्य असलेली गौरी ही जन्मत:च गतिमंद होती..!
गौरीचा जन्म झाला तेव्हाच डॉक्टरांनी तिच्या बाबतीतील हे कटू सत्य आम्हाला सांगितले तेव्हा आम्हालाही धक्का बसला. सुरुवातीचे दोन-तीन महिने खूप जड गेले. हे दु:ख आपल्याच वाटय़ाला का आले, असेही मनात आले. मात्र, आपली मुलगी जन्मत:च गतिमंद आहे, हे कटू सत्य आम्ही पचविले आणि आता आपण पुढे काय करायचे, याचा विचार करायला सुरुवात केली, गौरीची आई स्नेहा गाडगीळ ‘वृत्तान्त’ला सांगत होत्या.
डॉक्टरांनीही तिची कशी काळजी घ्यावी, तिला कसे वाढवावे याचे मार्गदर्शन केले. गौरीची आत्याही आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्यांचाही सल्ला मिळाला. अशा मुलांची प्रतिकारशक्ती खूप कमी असते. त्यामुळे तिला खूप जपा, असे डॉक्टरांनी सांगितल्यानुसार तिला वाढविताना आम्ही खूप काळजी घेतली. मोठी झाल्यावर तिला सर्वसाधारण मुलांच्याच शाळेत घातले होते. पहिलीपर्यंत तिची अभ्यासातील प्रगतीही चांगली होती. मात्र इयत्ता दुसरीमध्ये योग्य ते सहकार्य न मिळाल्याने आम्ही तिला विशेष मुलांच्या शाळेत दाखल केले. काही वर्षे ती या शाळेत गेली. पुढे घरीच अभ्यास घेऊन तिने दहावीची परीक्षा बाहेरून दिली, अशी माहितीही त्यांनी दिली.
ती मोठी होत होती पण गतिमंदत्वामुळे आलेल्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांमुळे तिच्या प्रगतीत अडथळे येत होते. अशा गतिमंद मुलांच्या हालचाली, विचार यात समन्वय नसतो. वागणे आणि बोलणे यातही सुसूत्रता नसते. त्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला मार्गदर्शन करताना या सगळ्यासाठी तिला पोहणे किंवा नृत्य शिकवा, असे सांगितले होते. त्याप्रमाणे गौरी पोहायला शिकली. भरतनाटय़म नृत्यप्रकारात पाठीच्या मणक्यावर ताण येत नाही. त्यामुळे हा नृत्यप्रकारही तिला शिकवायचे ठरविले. हळूहळू तिच्यातील बदल आम्हालाही जाणवायला लागला. तिच्या हालचालीत सुसूत्रता आली. बोलणे आणि वागणे यातही समन्वय निर्माण झाला. शाळेतर्फे आयोजित केलेल्या जलतरण स्पर्धेत तिला बक्षीस मिळाले आणि यातून गौरीचाही उत्साह वाढला. आपणही काही करू शकतो असा आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला. विविध स्पर्धामधून जलतरणात तिने बक्षिसे मिळविली. शांघाय येथे झालेल्या विशेष मुलांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळविले. हा क्षण आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा होता, हे सांगताना स्नेहा गाडगीळ यांचा कंठ दाटून आला.
‘यलो’ चित्रपटात काम करण्याची संधीही तिला मिळाली. खरं तर, तिला चित्रपट काय, त्याचे चित्रीकरण कसलाच अनुभव नव्हता. पण, महेश लिमये आणि चित्रपटातील सर्व कलाकारांनी आम्हाला, गौरीला खूप सांभाळून घेतले. सगळे जण तिच्याशी खूप आपुलकीने आणि मित्रत्वाच्या नात्याने वागले. त्यामुळे गौरीलाही वेगळे आणि अवघड असे काही वाटले नाही. तिच्याकडून ते सर्व सहजपणे होऊन गेले.
आपल्या मुलीच्या यशाच्या निमित्ताने, स्नेहा गाडगीळ यांना अशा विशेष मुलांच्या पालकांनाही आवाहन करावेसे वाटते आहे. आपले मूल मतिमंद किंवा गतिमंद असेल तर पालक आणि त्या मुलांच्या सर्व घरच्यांनी हे वास्तव सर्वप्रथम स्वीकारले पाहिजे, असे त्या सांगतात. आपल्या मुलाबद्दल चारचौघांना सांगताना कोणतीही लाज किंवा कमीपणा वाटू देऊ नये. मुळात आपल्या अशा मुलाचा पालकांनी मनापासून स्वीकार केला पाहिजे. तुम्हीच त्याला स्वीकारले नाही तर समाजाकडून तशी अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही. त्यांना कोणतीही वेगळी किंवा विशेष वागणूक देऊ नका. त्याला सर्वसाधारण मुलाप्रमाणेच वागवा. त्याच्या भावना, विचार समजून घ्या. त्याचा दुस्वास किंवा त्याला सतत हिडीसफिडीस करू नका, असे त्या कळकळीने सांगतात तेव्हा गौरीच्या जिद्दीमागचे बळ हे या मायेतच दडले आहे याचीही खात्री पटते.