तिरस्कारापेक्षा अधिक प्रेक्षक ‘मालविका’चं कौतुक करतात – अदिती सारंगधर | Loksatta

तिरस्कारापेक्षा अधिक प्रेक्षक ‘मालविका’चं कौतुक करतात – अदिती सारंगधर

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेत अदिती सारंगधर मालविकाची भूमिका साकारत आहे.

तिरस्कारापेक्षा अधिक प्रेक्षक ‘मालविका’चं कौतुक करतात – अदिती सारंगधर
तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरगोस प्रतिसाद देखील मिळतोय.

झी मराठी वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवाती पासूनच पसंती दर्शवली. प्रेक्षकांनी या मालिकेवरच नाही तर त्यातील व्यक्तिरेखांवर देखील प्रेमाचा वर्षाव केला आहे. शकू, नलू, ओम, स्वीटू, चिन्या, रॉकी आणि मालिकेतील सर्व पात्र ही प्रेक्षकांना आपलीशी आणि आपल्यातलीच एक वाटतात. इतकंच काय तर या मालिकेतील खलनायिका म्हणजेच मालविका या व्यक्तिरेखेला देखील प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे.

मालविकाची व्यक्तिरेखा अभिनेत्री अदिती सारंगधर अगदी चोख साकारतेय. तिला यासाठी प्रेक्षकांकडून भरगोस प्रतिसाद देखील मिळतोय. ही लोकप्रिय नकारात्मक व्यक्तिरेखा आणि त्याला मिळणारा प्रतिसाद याबद्दल बोलताना अदिती म्हणाली, “माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका निभावतेय. नकारात्मक भूमिकाच करायची आहे असं मी ठरवलं नव्हतं. पण कुटुंबासाठी वेळ आणि चित्रीकरणाचे तास हे गणित जुळवून काम करण्याची इच्छा होती.”

पुढे ती म्हणाली, “सुरुवातीला मालविकाचं पात्र साकारताना मला अक्षरशः रडू यायचं. कारण अशा प्रवृत्तीची माणसं मी माझ्या आजूबाजूला कधी पाहिली नाहीत. पण हळू हळू ते पात्र मी समजू लागले. मालविका ही एक कणखर आणि बेधडक व्यक्ती आहे. मालिकेत जरी माझी भूमिका नकारात्मक असली तरीही त्यातून शिकण्यासारखं बरच काही आहे. ‘घरातल्या व्यक्तींशी कसं वागू नये’ हे दाखवण्याचं काम मालविकाने केलं आहे. आता मला हे पात्र साकारताना खूप मजा येते. प्रेक्षक मालविकाचा जितका तिरस्कार करतात, तितकंच किंबहुना त्याहूनही जास्त मालविकाचं कौतुक करतात.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-07-2021 at 19:36 IST
Next Story
Video: असा जुळला दोन श्रीकृष्ण ‘समांतर’ येण्याचा योग