“बॉलिवूडने मिळून आपला कचरा साफ करावा, नाहीतर…”, रामदेव बाबांनी दिला इशारा!

या संपूर्ण प्रकरणावर योगगुरू रामदेव बाबा यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान गेल्या जवळपास १९ दिवसांपासून तुरुंगात आहे. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्ह दिसत नाही. बुधवारी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयानं आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. आर्यनच्या जामीन याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्हे दिसत नाहीत. मन्नत या आलिशान बंगल्यात राहणारा आर्यन सध्या तुरुंगात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर योगगुरू रामदेव बाबा यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूडमध्ये जे ड्रग्जचं विनाशकारी प्रकार चाललाय, तो भारतातील युवा पिढीसाठी फार धोकादायक आहे, असे रामदेव बाबा म्हणाले.

योगगुरू रामदेव बाबा त्यांच्या भूमिका आणि विधानांमुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिका विशेष चर्चेत राहिल्या आहेत. नुकतंच त्यांनी बॉलिवूड, ड्रग्स आणि आर्यन खान या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. रामदेव बाबा यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बॉलिवूडमध्ये सध्या चर्चेत असलेल्या ड्रग्ज प्रकरणी प्रश्न विचारले. या प्रश्नावर उत्तर देताना रामदेव बाबा म्हणाले, “बॉलिवूडमध्ये जे ड्रग्जचं विनाशकारी प्रकार चाललाय, तो भारतातील युवा पिढीसाठी फार धोकादायक आहे. नशा करण्याला ग्लॅमराईज केलं जातंय. ज्यांना आदर्श मानलं जायचं, ते लोक देखील या प्रकारच्या कट-कारस्थानात फसलेले दिसतात, तेव्हा लोकांना चुकीची प्रेरणा मिळते,” असे रामदेव बाबांनी सांगितले.

“सगळ्या इंडस्ट्रीनं मिळून आपला कचरा साफ करायला हवा. नाहीतर हा त्यांच्यासाठी देखील आत्मघातक ठरेल. मी तर योगाच्या माध्यमातून रोगमुक्ती, नशामुक्ती किंवा सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टींचं निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. योगमुळे व्यक्तीच्या शरीर, इंद्रीये आणि मनाची शुद्धी होते. त्यामुळे निश्चितरित्या माणूस हा पुढे जातो,” असेही ते म्हणाले.

८ ऑक्टोबरपासून आर्यन आर्थर रोड जेलमध्ये

दरम्यान गेल्या ८ ऑक्टोबरपासून आर्यन हा आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी वकिलांकडून पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत सलग सहा ते सात वेळा आर्यनच्या जामीनावर सुनावणी झाली असली तरी त्याला जामीन मिळालेला नाही. त्यामुळे साधारण २० दिवसांपासून आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. त्याला जेल मधील खाणे-पिणे आवडत नाही. त्यामुळे तो ते खात नसल्याचे बोललं जात आहे. तसेच तो बरॅकच्या बाहेरही येत नव्हता.

आर्यन खानच्या व्हाटस्अप चॅटमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे. त्यामुळे जामिनावर असताना तो अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही हे म्हणता येऊ शकत नाही, शिवाय एनसीबीने प्रकरणाशी संबंधित सादर केलेली कागदपत्रे आणि आर्यन, अरबाज यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वेच्छेने दिलेल्या जबाबानुसार त्यांनी सेवनासाठी अमलीपदार्थ बाळगल्याचे कबूल केले होते. यावरून अरबाजच्या बुटातून हस्तगत केलेल्या अमलीपदार्थाबाबत त्याला माहिती होती हेच स्पष्ट होते. या बाबी लक्षात घेता आरोपींना जामीन देता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Yoga guru baba ramdev comment on bollywood glamourizing drug culture amid ncb drug bust probe nrp