यावर्षी होळीच्या निमित्ताने लाईफ ओके चॅनलवर ‘होली है; लाईफ ओके है’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार हे निश्चित झाले आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे कारण, टेलिव्हिजन आणि बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांच्या सहभागामुळे या कार्यक्रमात संगीत, नृत्य आणि विनोदाची रेलचेल असणार आहे. विनोदी कलाकार भारती सिंग आणि टेलिव्हिजनच्या दुनियेत लोकप्रिय असणारा करण कुंद्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असल्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच ‘लाईफ ओके’ चॅनलवरील लोकप्रिय मालिका ‘सावधान इंडिया’चे होस्ट असणारी सुशांत सिंग आणि प्रत्युष बॅनर्जी ही जोडगोळीसुद्धा यावेळी महिलांनी होळीच्या दिवशी आपल्या सुरक्षिततेसाठी कशाप्रकारे खबरदारी घ्यायची याबद्दल सांगतील. या सगळ्याच्या जोडीला आपल्या रॅप संगीताने धमाल उडवून देण्यात माहीर असलेला हनीसिंग ‘होली है; लाईफ ओके है’  कार्यक्रमात परफॉर्म करणार असल्यामुळे या सोहळ्याला चार चाँद लागणार हे तर निश्चितच झाले आहे. त्यामुळे आता १२ मार्च रोजी ‘होली है; लाईफ ओके है’ कार्यक्रमाकडे प्रेक्षकांचे डोळे लागून राहिले असतील एवढे मात्र खरे.