Yuzvendra Chahal breaks silence on working with ex-wife Dhanashree Verma : क्रिकेटपटू युजवेंद्र चहल व त्याची एक्स पत्नी धनश्री वर्मा दोघेही आगामी रिॲलिटी शोमध्ये पुन्हा एकत्र दिसणार, अशा चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या होत्या. घटस्फोटानंतर वर्षभराने युजवेंद्र व धनश्री एकत्र काम करणार हे ऐकून चाहत्यांमध्येही उत्सुकता होती. आता अखेर युजवेंद्रनेच धनश्रीबरोबर काम करण्याच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
‘द 50’ नावाचा एक रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये युजवेंद्र चहल सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात होतं. या शोमध्ये त्याची एक्स पत्नी धनश्रीही भाग घेणार अशी चर्चा रंगली होती. आता चहलच्या टीमने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याबद्दल प्रतिक्रिया दिली.
युजवेंद्रने सांगितलं की ज्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत, त्याचा शोशी कोणताही संबंध नाही आणि या संदर्भात कोणतीही चर्चा किंवा करार झालेला नाही. “युजवेंद्र चहलच्या रिॲलिटी शोमध्ये सहभागी होण्याबद्दल सध्या पसरत असलेल्या कोणत्याही बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. हे दावे चुकीचे आहेत,” असं निवेदनात म्हटलं आहे.
“अलीकडील वृत्तांमध्ये ज्या शोचा उल्लेख केला आहे, त्या शोशी युजवेंद्र चहलचा कोणताही संबंध नाही. तसेच यासंदर्भात युजवेंद्रची कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा करार झालेला नाही. आम्ही मीडिया प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया युजर्सना विनंती करतो की त्यांनी खोटी माहिती प्रसारित करू नये,” असं निवेदनात लिहिलं आहे.

दरम्यान, धनश्री वर्माने या शोमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. द 50 हा आगामी रिॲलिटी शो १ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. फराह खान हा शो होस्ट करणार आहे. तिच्या मते, भारतातील रिॲलिटी शोज अनेक वर्षांपासून एका विशिष्ट पद्धतीत दाखवले जात आहे. त्यामुळे ‘द 50’ हा शो वेगळा असून ही पद्धत बदलणार आहे.
धनश्री वर्मा-युजवेंद्र चहल लग्न व घटस्फोट
धनश्री वर्मा व युजवेंद्र चहल यांनी काही महिन्यांच्या डेटिंगनंतर डिसेंबर २०२० मध्ये लग्न केलं होतं. काही काल त्यांनी एकत्र घालवला, पण नंतर २०२२ मध्ये ते वेगळे राहू लागले आणि त्यांनी २०२३ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यांना घटस्फोट कोर्टाने मार्च २०२५ मध्ये मंजूर केला.
धनश्री वर्मापासून विभक्त झाल्यावर युजवेंद्र चहलचं नाव आरजे माहवशबरोबर जोडलं जाऊ लागलं. पण माहवश व युजवेंद्र दोघेही आपण फक्त चांगले मित्र असल्याचं सांगतात. दुसरीकडे धनश्री घटस्फोटानंतर राईज अँड फॉल नावाच्या शोमध्ये सहभागी झाली होती.
