Gauahar Khan Husband Zaid Darbar Childhood Struggle: प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व गौहर खानचा पती झैद दरबारने आपल्या बालपणावर खुलासा केला आहे. तो लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. याचा त्याच्या मनावर काय परिणाम झाला, हे त्याने सांगितलं. झैदचे वडील संगीतकार इस्माईल दरबार आहेत. त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘देवदास’ सारख्या चित्रपटांना संगीत दिलं. यामुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. इस्माईल दरबार व्यावसायिक आयुष्यात यशाच्या शिखरावर असताना, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र संघर्ष सुरू होता.
मिर्ची प्लसला दिलेल्या मुलाखतीत झैदने त्याच्या बालपणाबद्दल सांगितलं. झैद अवघा १० वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि वयाच्या १२ व्या वर्षापासून तो एकटाच राहू लागला. पालकांच्या घटस्फोटामुळे झैद खूप व्यथित झाला होता. त्यांच्या विभक्त होण्याचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. “माझ्या बालपणाने मला खूप काही शिकवलंय. जेव्हा तुम्ही १० वर्षांचे असता आणि तुमचे आई-वडील विभक्त होतात, पुन्हा दुसरं लग्न करतात… तेव्हा मी भावनिकदृष्ट्या खचलो होतो. १२ वर्षांचा असल्यापासून मी एकटाच राहतोय, पूर्णपणे एकटा” असं झैद म्हणाला.
१० व्या वर्षीच समजलं की पैसे कमवावे लागतील
झैदने सांगितलं की, १० व्या वर्षीच त्याला पैशांचं कठोर वास्तव समजलं होतं. “वयाच्या १० व्या वर्षीच मला समजलं होतं की, घर चालवण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात आणि पैसे कमवावे लागतात. पैसे कमावल्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही, याची जाणीव मला तेव्हाच झाली होती,” अशी आठवण झैदने सांगितली.
झैदची धाकटी बहीण फक्त ३ वर्षांची होती, तेव्हापासून त्याला तिची काळजी घ्यावी लागली होती. खूप लहान वयातच त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली होती. पैसे कमवण्यासाठी त्याने श्यामक दावर यांच्या डान्स ग्रुपमध्ये डान्सर आणि ट्रेनर म्हणून काम केल्याची आठवणही त्याने सांगितली.
इस्माईल दरबार दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाले होते?
इस्माईल दरबार यांनी पूर्वी विकी लालवानीशी बोलताना त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं होतं. पहिल्या पत्नीपासून वेगळे होण्यापूर्वी जवळपास १० वर्षे अनेक अडचणींचा सामना करत होतो, असं ते म्हणाले होते. पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांशी असलेल्या नात्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. “ते आयुष्यात कधीही माझ्याशी उद्धटपणे वागले नाही, हा त्यांचा मोठेपणा आहे. ते आजही माझा आदर करतात,” असं त्यांनी म्हटलं होतं.
पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्याआधीच दुसऱ्या पत्नीबरोबर संबंध होते, अशी कबुली इस्माईल दरबार यांनी दिली होती. “हो, पण तेव्हा आमच्यातील मतभेद टोकाला पोहोचले होते. मी ते घर सोडलं होतं आणि दोन महिने दुसऱ्या घरी राहत होतो. मी पहिल्या पत्नीला काहीही सांगितलं नाही आणि थेट सुरतला जाऊन आयशाशी लग्न केलं,” असं इस्माईल दरबार म्हणाले होते.
