या वर्षी अनेक प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन्स आणि त्यांनी केलेले अश्लील विनोद आणि त्या क्लिप व्हायरल होत आहेत. कॉमेडियन समय रैनाच्या शो वरुन मोठा वादही झाला. ज्यानंतर प्रेक्षकांनी अश्लील कंटेट असं म्हणत लोकांनी या शोवर टीकाही केली होती. यावरुन जो वाद निर्माण झाला त्यावर जावेद अख्तर यांनी जोरदार टीका केली. दरम्यान कॉमेडियन झाकीर खानने जावेद अख्तर म्हणाले ते योग्यच आहे असं म्हटलं आहे. पण त्यावर त्याने त्याची मतंही मांडली आहेत.
जावेद अख्तर यांनी काय म्हटलं होतं?
शोले, दीवार, जंजीर यांसारख्या जबरदस्त चित्रपटांचे संवाद लिहिणारे आणि कवी जावेद अख्तरयांनी कॉमेडी कंटेटमध्ये येणाऱ्या अश्लीलतेबाबत भाष्य केलं. जावेद अख्तर म्हणाले की कंटेटमध्ये अति प्रमाणात शिव्या येणं हे कमकुवत विचार लपवण्याचं लक्षण आहे, त्यासाठीच असा अश्लीलतेचा आधार घेतला जातो. जर एखादी चर्चा, एखादा शो फिका जातो असं वाटलं गेलं की त्यात शिव्यांचं तिखट घातलं जातं. या आशयाचं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं.
भाषेवर प्रभुत्व असेल तर…
जावेद अख्तर पुढे म्हणाले, ओडिशा असो, बिहार असो किंवा मेक्सिको ज्या ठिकाणी गरिबी आहे तिथे लोक त्यांच्या जेवणात मिरचीचा उपयोग जास्त करतात कारण त्यांचं जेवण अळणी असतं. जेवणाला थोडी लज्जत यावी म्हणून ते मिरची खातात. शिवराळ भाषा ही त्या मिरचीसारखी आहे. जर तुमची भाषा चांगली आहे, तुमचं भाषेवर प्रभुत्व आहे तर तुम्हाला मिरचीची गरज पडणार नाही. जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यावर झाकीर खानने प्रतिक्रिया दिली आहे.
झाकीर खानचं म्हणणं काय?
इंडियन एक्स्प्रेसच्या एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात झाकीर खान याने जावेद अख्तर यांच्या टीकेला उत्तर दिलं. झाकीर म्हणाला की मी जावेद अख्तर यांचा खूप आदर करतो. मला त्यांचं काम आवडतं. एक कलाकार म्हणून आम्ही सगळेच जण अशा कलाकारांविषयी आदर बाळगतो जे कलाकार वेळेबरोबर स्वतःमध्ये बदल घडवतात. जावेद अख्तर हे प्रचंड वाचन करतात. एक लेखक म्हणून भाषा आणि संस्कृतीचं प्रतिनिधीत्वच ते करतात. त्यामुळे त्यांचं म्हणणं एका अर्थाने योग्यच आहे.
ओघाने येणाऱ्या शिव्या तुम्ही थांबवू शकत नाही-झाकीर खान
पण दुसरा एक पैलू जो मला दिसतो तो असा आहे की तुम्ही ओघाने येणाऱ्या शिव्या या थांबवू शकत नाही. जर एखादी बोली बोलताना त्यात शिव्या आल्या तर त्या थांबवण्यात अर्थ नसतो. जेव्हा माणसं समजूतदार होतात तेव्हा ते आपोआपच या गोष्टींपासून लांब राहणं पसंत करतात. पण म्हणून तुम्ही कुणावरही बोट उचलून ठपका ठेवू शकत नाही. असं उत्तर झाकीर खानने दिलं आहे.
