Zakir Khan Talks About Taking Break From Comedy : झाकीर खान लोकप्रिय हिंदी स्टँडअप कॉमेडियनपैकी एक आहे. त्यानं त्याच्या विनोदी शैलीद्वारे अनेकांची मनं जिंकली आहेत. पण, काही दिवसांपूर्वीच त्यानं तो आता कामातून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानं त्याच्या आरोग्याच्या कारणांमुळे हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं.
झाकीर खाननं घेतलेला हा निर्णय अचानक घेतला नसून, खूप आधीपासून तो याबद्दल विचार करत होता. त्याबद्दलची सविस्तर माहिती त्यानं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘गल्प न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे. यावेळी त्यानं त्याला असलेल्या आरोग्याच्या समस्यांबद्दलही माहिती दिली.
झाकीर खान नेमकं काय म्हणाला?
झाकीर खान म्हणाला, “मला माझ्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. माझ्या कुटुंबात काही आनुवंशिक आजार आहे, जे एका ठरावीक वयानंतर उदभवतात. त्याव्यतिरिक्त मी स्वत:सुद्धा माझ्या शरीराचं नुकसान केलं. फक्त २ तास झोपून हजारो लोकांना भेटायला जातो.” पुढे त्यानं, त्याच्या कुटुंबात इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळवणारी त्याची ही पहिलीच पिढी आहे. त्यामुळे त्याला त्याच्या पुढच्या पिढीप्रतिसुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत, असं त्याला वाटतं, असं त्यानं म्हटलं आहे.
झाकीर खान पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही सलग १० वर्षं काम करता तेव्हा त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो. म्हणून मी ठरवलेलं की, कामाबरोबर आरोग्याचीही काळजी घ्यायची; पण मागच्या काही वर्षांमध्ये ते जमलंच नाही. पण, जेव्हा मी अमेरिकेत होतो तेव्हा मला जाणवलं की, दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळणं शक्य नाहीये.”
झाकीर खाननं गेल्या आठवड्यात हैदराबाद येथील एका कार्यक्रमात तो त्याच्या कामातून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी निराशा व्यक्त केली. झाकीरनं आजवर त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना हसवलं. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावरही त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या रील्स व्हायरल होत आहेत.

