Zanai Bhosle shared emotional post for grandmother Asha Bhosle : सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं काही दिवसांपूर्वी दु:खद निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला. यामुळे सध्या भोसले कुटुंबीयसुद्धा कठीण काळातून जात आहेत. अशातच आता त्यांची नात जनाई भोसलेने त्यांच्याबरोबरची एक आठवण शेअर केली आहे.

१२ एप्रिल रविवारी आशा भोसले यांचं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं त्यानंतर सोमवारी १३ एप्रिल रोजी त्यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कलाविश्वातील अनेकांनी हजेरी लावत दु:ख व्यक्त केलं. अशा कठीण परिस्थितीत सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांचं आणि नात जनाईचं सांत्वन करत होते. आशा भोसले व त्यांची नात जणाई यांचं नातं खूप घट्ट होतं आणि त्यांची नात अनेकदा त्यांच्याबरोबर कार्यक्रमांमध्ये उपस्थित असायची. त्यामुळे आजीचं जाणं तिच्यासाठी जणू एक मोठा धक्का आहे. 

जनाईने आजी आशा यांच्या निधनानंतर दु:खाच्या वेळी त्यांच्याबरोबर उपस्थित असणाऱ्या आणि सांत्वन करणाऱ्या सर्वांचे सोशल मीडियामार्फत आभार मानले होते. अशातच आता आजीच्या निधनाच्या काही दिवसांनंतर तिने सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्या मुलाखत देताना आणि केक कापताना दिसत आहेत. जनाईने या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने अनेकांचं लक्ष वेधलं. 

जनाई भोसले काय म्हणाली?

जनाईने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत “मी प्रार्थना करते की, तू पुन्हा माझ्या रक्ताचा एक भाग म्हणून माझ्याकडे यावस
हे नातं आत्म्याशी कायमचं जोडलेलं आहे.” अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओमध्ये आशा भोसले त्यांच्या नातवंडांबरोबर केक कापताना दिसत आहेत. यावेळी त्या त्यांचा नातू व नात जनाईला केक भरवताना दिसतात. या व्हिडीओमध्ये आशा भोसले त्यांच्या दोन्ही नातवंडांबरोबर आनंद साजरा करताना दिसत आहेत. 

जनाईचं तिच्या आजीबरोबर खूप घट्ट नातं होतं आणि ती नेहमी त्यांच्याबरोबरच असल्याने त्यांच्या जाण्याचा तिला खूप त्रास होणं साहजिक आहे. जनाईने यापूर्वीसुद्धा सोशल मीडियावर आजीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. आशा भोसले व जनाई यांचे अनेक फोटो व व्हिडीओ पूर्वीसुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरलं झाले आहेत. आशा भोसले यांच्यामागे त्यांचा मुलगा, सून आणि नातवंडं असं कुटुंबं आहे. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीय हळूहळू या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.