Zanai Bhosle Shares Asha Bhosle Unseen Video: गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वात जास्त धक्का त्यांच्या नातीला, जनाई भोसले हिला बसला आहे. आजीसोबत अत्यंत घनिष्ट नातं असलेल्या जनाईने नुकताच एक अनसीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघींमधील मैत्री आणि प्रेम स्पष्टपणे जाणवते. “माझ्या जन्मानंतर मला जवळ घेणारी ती पहिली व्यक्ती होती,” असे लिहित तिने आपल्या मनातल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली आहे. आजीसोबतच्या चहाच्या गप्पा, बालिश विनोद आणि मिठी यांसारख्या आठवणींना उजाळा देत तिने चाहत्यांनाही भावुक केलं आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्याही डोळ्यांत पाणी आलं आहे.

जनाई भोसलेने आजी आशा भोसलेंचा एक अनसीन व्हिडीओ शेअर करून भावुक पोस्ट केली. तिने लिहिलं, “आज सकाळी उठल्यावर मला जाणवलं की मी माझी सर्वात जवळची मैत्रीण, प्रत्येक गोष्टीत माझ्याबरोबर असणारी माझी बेस्ट फ्रेंड आणि माझं संपूर्ण जग पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला गमावलंय. माझ्या जन्मानंतर मला जवळ घेणारी ती पहिली व्यक्ती होती.

आता मी काय करू? सकाळी उठल्यावर मी कोणाला मिठी मारू आणि कोणासोबत चहा पिऊ? रोज घरी आल्यावर माझी वाट कोण बघणार किंवा मी कोणासोबत बालिश विनोद करणार?

तिच्या आठवणी सांगण्यासाठी या तर केवळ काही गोष्टी आहेत. पण ज्यांना माझ्यासारखंच दुःख झालं आहे, त्यांनी एक लक्षात ठेवा की ती ‘आनंद’ आणि ‘हास्या’चा खरा अर्थ होती. त्यामुळे तिची आठवण काढताना नेहमी याच स्वरूपात काढा!

पाहा आशा भोसलेंचा व्हिडीओ

ती वरून आपल्या सर्वांकडे, खासकरून तिच्या कुटुंबाकडे बघतेय. मला विश्वास आहे की ती माझ्याकडे लवकरच परत येईल, कारण तिने मला नेहमी तसं वचन दिलं होतं. मी माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्ती गमावली आहे आणि जगात यापेक्षा मोठं दुसरं कोणतंही दुःख नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की, तुमचं आयुष्य भरभरून जगा आणि त्याच पद्धतीने तिचा व तिच्या आयुष्याचा उत्सव साजरा करा.

‘आशाआई’, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता तुला निरोप देतेय… मला माहित आहे की काहीही झालं तरी तू नेहमी माझ्याबरोबर असणार आहेस. मी फक्त तू परत येण्याची आणि मला पुन्हा एकदा मिठी मारण्याची वाट पाहत आहे,” अशी पोस्ट जनाई भोसलेने केली आहे.

टीप: हा व्हिडीओ आम्ही एकत्र ज्या कार्यक्रमांना जायचो तिथे केलेल्या एका पर्सनल जोकबद्दल आहे.