scorecardresearch

“मी सलमान खानच्या पाठीवरील माकड होऊ शकत नाही…”; झरीन खान संतापली

नुकतंच झरीनने एका मुलाखतीत सलमान खान आणि तिच्या नात्याबद्दलचा खुलासा केला आहे.

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानच्या वीर चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री झरीन खानला ओळखले जाते. मात्र तिचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास फार खडतर होता. झरीन खान ही बॉलिवूडमध्ये जास्त प्रमाणात सक्रीय नसली तरी ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमी मनमोकळेपणाने बोलत असते. नुकतंच झरीनने एका मुलाखतीत सलमान खान आणि तिच्या नात्याबद्दलचा खुलासा केला आहे.

वीर चित्रपट फ्लॉप झाल्यानतंरही सलमान खान हा नेहमी झरीनला मदत करतो, अशी चर्चा कायमच सिनेसृष्टीत रंगत असते. नुकतंच या सर्व चर्चांवर झरीन खानने स्पष्ट शब्दात उत्तर दिले. झरीन खानने नुकतंच हिंदुस्तान टाईम्स या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच तिच्या फिल्मी करिअरबद्दलही खुलासा केला आहे.

या मुलाखतीत झरीन खान म्हणाली की, “चित्रपटसृष्टीतील माझ्या जागेवर मी नेहमीच खूप समाधानी आहे. यामुळे मी कधीही कोणत्याही शर्यतीचा भाग बनली नाही. पण आता मात्र मी खूप बदलली आहे. कारण तुम्ही ए-लिस्टर असल्याशिवाय लोक तुमची वाट पाहत नाहीत, हे मला समजलं आहे.”

यानंतर मुलाखतीत तिला सलमान खानबद्दल विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, “अजूनही अनेकांच्या मनात असा समज आहे की सलमान खान मला मदत करत आहे. पण मी सलमान खानचे आभार मानते कारण जर तो नसता तर मी कधीही सिनेसृष्टीत प्रवेश केला नसता. सलमान खानने मला सिनेसृष्टीत येण्याची संधी दिली. पण जेव्हा मी सिनेसृष्टीचा भाग बनले, तेव्हा खऱ्या अर्थाने माझा संघर्ष सुरु झाला. त्यावेळी मला काहीही माहिती नव्हते.”

“सलमान खान हा एक अद्भुत व्यक्ती आहे. पण तो फार व्यस्त असतो. त्यामुळे प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी मी सलमान आणि त्याच्या भावांच्या पाठीवरील माकड होऊ शकत नाही. आजपर्यंत अनेकांना असे वाटते की मी जे काही काम करते ते सलमान खानच्या माध्यमातून करते, पण हे खरे नाही. सलमान हा मित्र आहे. तो माझ्यापासून फक्त एक फोन कॉल दूर आहे. पण म्हणून मी त्याला त्रास देत नाही. यामुळे माझा संघर्ष, मेहनत ही कमकुवत होत जाते,” असेही झरीन खान म्हणाली.

Lata Mangeshkar Health Update : लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांच्या परवानगीनंतर डिस्चार्ज मिळणार

“विशेष म्हणजे माझा असा विश्वास आहे की अनेक लोकांनी माझा बेधडक स्वभाव अहंकारी म्हणून घेतला आहे. माझे वडील आम्हाला लहान असताना सोडून गेले. त्यामुळे माझ्या कुटुंबाची आर्थिक काळजी घेण्याची जबाबदारी मी घेतली. मला मदत किंवा मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते. मी फार घाबरली होती आणि अनेकांनी ते अहंकारी म्हणून घेतले. अनेकदा मी सिनेसृष्टीत हरवून गेली आहे, असेही मला वाटले. मला चांगलं काम करायचं होते, पण मला अभिनय कौशल्य दाखवायची परवानगी नव्हती,” असेही ती म्हणाली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Zareen khan says she cannot be a monkey on salman khan back a lot of people still have that assumption nrp

ताज्या बातम्या