“वऱ्हाड निघालं अमेरिकेला”, ‘या’ तारखेपासून सुरु होणार ‘चला हवा येऊ द्या’चे नवीन पर्व

झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.

‘कसे आहात मंडळी, हसनाय ना, हसायलाच पाहिजे’ असं म्हणत गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या लोकप्रिय कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रासह राजकारणातील दिग्गज मंडळी येऊन गेली आहेत. मात्र आता चक्क विनोदाची चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’मधील मंडळी परदेश दौरा करणार आहेत.

झी मराठीने नुकतंच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. यात भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके ही मंडळी विमानात बसलेली दिसत आहे. तर श्रेया बुगडे ही विमानाच्या मागे, तसेच सागर कारंडे हा विमानाच्या पंखांना लटकल्याचे बघायला मिळत आहे. “भाऊचा पंगा, अमेरिकेत दंगा; चला हवा येऊ द्या, वऱ्हाड निघालयं अमेरिकेला,” असा संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे.

त्यासोबतच या व्हिडीओला “वऱ्हाड निघालं अमेरिकेला, नवीन पर्व ६ डिसेंबरपासून,” असे कॅप्शन देण्यात आले आहे. झी मराठीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ६ डिसेंबरपासून ‘चला हवा येऊ द्या’चे नवीन पर्व सुरु होत आहे. या नवीन पर्वात नवीन काय बघायला मिळणार यासाठी सर्वच प्रेक्षक प्रचंड उत्सुक असल्याचे दिसत आहेत.

हेही वाचा : ‘आलू का पराठा…’, उर्फीचा अजब लूक सोशल मीडियावर व्हायरल

झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. या कार्यक्रमातील विनोदवीरांचे असंख्य चाहते आहेत. दरम्यान चला हवा येऊ द्या मधील ही सर्व मंडळी अमेरिकेत नेमकी काय धमाल, मस्ती करतात? परदेशी लोकांना हा सर्व कार्यक्रम आवडतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Zee marathi chala hawa yeu dya team on america tour new episode start from this date nrp

ताज्या बातम्या