महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणून ‘होम मिनिस्टर’ला ओळखले जाते. गेल्या १८ वर्षांपासून अविरतपणे हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा कार्यक्रम सादर करणारे सूत्रसंचालक आदेश बांदेकर हे ‘भावोजी’ म्हणून घराघरात लोकप्रिय झाले आहेत. महाराष्ट्रातील विविध शहरात, गावात जाऊन होम मिनिस्टरने तेथील महिलांना या खेळात सहभागी होण्याची संधी दिली. त्यांना पैठणीसहित काही आनंदाचे आणि कायम स्मरणात राहतील असे अनेक क्षण दिले. अवघ्या तेरा दिवसांसाठी सुरु केलेल्या या कार्यक्रमाला बघता बघता १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्तानं आदेश बांदेकरांनी होम मिनिस्टरच्या टीमसह सेलिब्रेशन केलं आहे. यावेळी त्यांनी अठरा वर्षांच्या प्रवासाच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झी मराठीने नुकतंच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत आदेश बांदेकरांसोबतच होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या पडद्यामागचे कलाकार सहभागी झाले आहेत. यावेळी आदेश बांदेकरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी आदेश बांदेकर म्हणाले, “आमच्या सर्वांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण कारण १३ सप्टेंबर २००४ हा दिवस कधी इतका मोठा इतिहास घडवेल असं वाटलं नव्हतं. फक्त १३ दिवसांसाठी सुरु झालेला हा कार्यक्रम आणि आज १३ सप्टेंबर २०२२ ला त्याला १८ वर्ष पूर्ण होत आहेत.”
आणखी वाचा : “मी सिलेंडरवर बसून होम मिनिस्टरचा तो एपिसोड शूट केला”, आदेश बांदेकरांनी सांगितला किस्सा

“मी भाग्यवान की महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन ही आनंदयात्रा आणि या आनंदयात्रेच्या पालखीचा भोई होण्याचं भाग्य मला लाभलं. जी जी स्वप्न पाहिली होती, ती सगळी पूर्ण झाली. या कार्यक्रमानं वेगळा आशीर्वाद दिला. हे मायबाप प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि अर्थात माझ्याबरोबर असणाऱ्या असंख्य पडद्यामागचे कलाकार यांचे आभार. झी मराठीचे खूप खूप धन्यवाद. जगाच्या नकाशावर रोज एका कुटुंबाला बोलतं करणारा आणि इतकी वर्ष चालणारा एकही कार्यक्रम नाही”, असे आदेश बांदेकर म्हणाले.

यावेळी त्यांनी झी मराठीचे देखील आभार मानले. तसेच त्यांच्या बरोबर पडद्यामागची टीम होती. यावेळी आदेश बांदेकरांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमात पडद्यामागे गेल्या १८ वर्षांपासून काम करणारे स्पॉट बॉय मिथिलेश यांच्या हातून केक कापला. बांदेकर या टीमचं कौतुक करत म्हणाले की, ”करोना काळात कार्यक्रम बंद होता, तरीही ही टीम इथेच राहिली. दुसरीकडे गेली नाही.”

आणखी वाचा : “ती ११ लाखांची पैठणी मी देणार नाही…”, आदेश बांदेकरांनी ट्रोलर्सला सुनावले खडे बोल

दरम्यान गेल्या १८ वर्षांपासून होम मिनिस्टर हा लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. होम मिनिस्टरमधील ‘महा मिनिस्टर’या पर्वाची विशेच चर्चा रंगली. या नवीन पर्वाच्या विजेतीला ११ लाखांची पैठणी मिळणार असल्याने हे पर्व फार गाजले. सोन्याची जर आणि हिरे जडलेल्या या पैठणीची चर्चा सगळीकडे सुरु आहे. राज्याच्या जिल्ह्या-जिल्ह्यात या शोचे खेळ रंगले होते. त्यामुळे हे पर्व घराघरात लोकप्रिय ठरले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi home minister programme complete 18 years actor aadesh bandekar emotional video viral nrp
First published on: 16-09-2022 at 09:01 IST