15 August 2020

News Flash

भावनाओं को समझो!

मानसशास्त्रानुसार भावनिक बुद्धिमत्ता ही एक प्रकारची क्षमता आहे.

आवडती व्यक्ती भेटली की आपल्याला आनंद वाटतो, यश मिळाले की अभिमान वाटतो, मनासारखं सगळं घडलं की हायसं वाटतं. आणि अपमान झाला की वाईट वाटतं, संकट आलं की भीती वाटते, कलह माजला की अस्वस्थ वाटतं. या ‘वाटण्या’ला आपल्या जीवनात महत्त्व आहे. दैनंदिन जीवनात हे ‘वाटणं’ बऱ्याचदा आपल्याला एखादी कृती करण्यास प्रोत्साहित करतं वा एखादी गोष्ट टाळण्यास भाग पाडतं. ‘भावना’ आणि भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनांवरील भाष्य पार अगदी विचारवंत अ‍ॅरिस्टॉटल यांच्या काळापासून आढळतं. त्यांनी त्यांच्याच एका ग्रंथात यासंबंधी विश्लेषण केलेलं आहे. त्यांच्या मते, ‘ज्या गोष्टींप्रती राग येणं अपेक्षित आहे, त्यांवर न रागवणारी व्यक्ती मूर्ख समजली जाते; या बरोबरीने योग्य वेळी योग्य पद्धतीने किंवा योग्य व्यक्तींवर भावनिक प्रकटीकरण न करणारी  व्यक्तीसुद्धा याच प्रकारात मोडते. अशी व्यक्ती गोष्टींचा भावनिक अनुभव घेऊ शकत नाही. या व्यक्ती कशानेही हेलावत नाहीत आणि स्वसंरक्षण  करण्यातही असमर्थ ठरतात. या भाष्याचा मथितार्थ लक्षात घेतला तर असे लक्षात येईल की, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने  प्रतिकार हा महत्त्वाचा असतो. परिस्थिती, संबंधित व्यक्ती आणि आपली मानसिक जडण-घडण या तीनही बाबींचा विचार मानवी-जीवनात अपेक्षित आहे. थोडक्यात, मानव आणि भावना या शक्ती एकमेकींना बांधल्या गेलेल्या आहेत. भावनांची ओळख, अनुभव, आकलन आणि प्रकटीकरण हे ‘मानवा’ला साजेसे आहे, गरजेचे आहे, उपयुक्त आहे.

‘भावनिक बुद्धिमत्ता’ हा हल्ली बहुचर्चित विषय आहे. मानसशास्त्रानुसार भावनिक बुद्धिमत्ता ही एक प्रकारची क्षमता आहे. स्वत:च्या व इतरांच्या भावना ओळखण्याची, त्यांचे व्यवस्थापन करण्याची कला आहे.  यात तीन बाबी दडलेल्या आहेत. पहिली म्हणजे- आपल्या व इतरांच्या भावनांप्रतीची भावनिक सजगता व जागरूकता. दुसरी म्हणजे, त्यांची योग्य ती सांगड घालून विचारांना जोड देण्याची, समस्यांमधून मार्ग काढण्यासाठीची क्षमता. आणि तिसरी म्हणजे, या भावनांचे व्यवस्थापन करण्याची! स्वत:च्या  भावना योग्य दिशेने वळू देण्याची, वळवण्याची, भिन्न भावनांचा योग्य अर्थ लावण्याची; इतकेच नव्हे, तर नाराज व्यक्तीला  करण्याची आणि अतिउत्तेजित व्यक्तीला शांत करण्याची क्षमता हीसुद्धा भावनिक बुद्धिमत्तेचा एक पैलू म्हणता येईल.

‘भावनिक बुद्धिमत्ता’ या संकल्पनेला अनेक कंगोरे आहेत. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे सतत दुसऱ्याचं मत आणि मन जपणं, सगळ्यालाच ‘हो’ म्हणणं, सतत शांत मुद्रा, अवाजवी आशावाद. स्वत:च्या भावना समजण्याची व त्या योग्यरीत्या, योग्य तिथे, योग्य प्रमाणात व्यक्त करण्याची क्षमता किंवा स्वत:च्या भावनांमागील कारण समजून घेण्याची, इतरांच्या भावना अचूकपणे समजण्याची, त्यांच्या कृतींकडे लक्षपूर्वक पाहून त्यातील बारकावे टिपून संभाव्य भावनाविष्काराचा कयास लावण्याची, त्यांच्या भावनांप्रती सहिष्णुता दर्शवण्याची, बाळगण्याची क्षमता म्हणजेही भावनिक बुद्धिमत्ता होय. इतकंच नव्हे तर स्वत:च्या  भावना अतिउत्तेजित परिस्थितीतही संयमाने व्यक्त करण्याची क्षमता, तसेच भावनांचा स्तर, वेग, दाह, नियंत्रित ठेवून कार्यपद्धती आणि कार्यभाग कार्यक्षमपणे करण्याचे ठरवणे आणि ते पूर्णत्वास नेणे म्हणजेही भावनिक बुद्धिमत्ताच!

हे वर्णन वाचल्यानंतर आपल्यातील बऱ्याच लोकांना ही खात्री पटेल की हे सगळं तर आपण नेहमीच करतो, त्यामुळे आपण भावनिकदृष्टय़ा बुद्धिमान आहोत. असूही; परंतु या बुद्धिमत्तेची धार कायम ठेवण्यासाठी तिला वेळोवेळी टोकदार करण्याची गरज आहे, हे नक्की. लोक माझ्या भावना समजूनच घेत नाहीत, अशी आपली तक्रार असते. आणि आपण तक्रार करत असलेल्या व्यक्तींची, आपल्या बाबतीतही नेमकी हीच तक्रार असते. कोणाचे म्हणणे ग्रा धरायचे आणि कोणाचे चुकीचे, या वादात वेळ फुकट घालवण्यापेक्षा सुरुवात स्वत:पासून करू. हे अवलोकन काही विशिष्ट घटकांवर आधारित आहे, असं काही मानसशास्त्रज्ञांचं मत आहे. भावनाविश्वाकडे कार्यक्षम पद्धतीने पाहण्यामागे, आपल्या मानसिक प्रक्रियांप्रतीचे आपले ‘ज्ञान’ महत्त्वाचे आहे. आपल्या भावना, त्यांचे स्वरूप, त्यामागील कारणं, त्या व्यक्त केल्यास वा न केल्यास होणारे परिणाम, त्यावर इतरांच्या संभाव्य प्रतिक्रिया याबद्दलचे हे ज्ञान. आपण आपली भावना व्यक्त केल्यावर, इतर लोक काय म्हणतील- करतील – समजतील याबद्दलचे आपले ठोकताळे योग्य आहेत का किंवा ते तसे ठरलेत का? या सगळ्या ज्ञानाचा उपयोग भावना सुज्ञपणे इतरांपर्यंत पोहोचवताना आपण करतो का, हे पाहणेही जरुरीचे आहे. उदा. आपली चूक आहे हे आपल्याला मनोमन पटलेलेअसताना, परंतु तरीही इतरांनी ती आपल्याला दाखवून दिल्यावर, आपण ती मान्य करतो की अहंकार डिवचला गेल्याच्या, अपमान झाल्याच्या, कमी लेखले गेल्याच्या आविभार्वात स्वसंरक्षणाच्या मुखवटय़ाआड, त्याचा राग- राग करतो? संताप व्यक्त करतो? अशावेळी आपली ही निवड आपल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या स्तरावर अवलंबून असते.

भावनिक बुद्धिमत्ता आणि कौशल्य याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर, मानसिक- शारीरिक स्वास्थ्यावर, नातेसंबंधांवर, शैक्षणिक यशावर, नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी होताना दिसतो, असे संशोधन सांगते. इतकेच नव्हे, तर ताण-तणावाशी लढाण्यात, जीवनाला योग्य दिशा आणि अर्थ जोडण्यात याचा मोलाचा सहभाग असतो.

हे कौशल्य कसे विकसित करावे, यावर थोडक्यात.. पहिला मोर्चा हा आपल्या नकारात्मकतेला प्रोत्साहन देणाऱ्या भावनांकडे वळवावा. या भावना तीव्र असतात, थैमान घालण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती बाळगून असतात. त्यामुळे गरज आहे ती या नकारात्मक भावनांचे योग्य व्यवस्थापन करण्याची. ज्याकारणे, या भावना आपल्या वर्तन आणि तर्कबुद्धीच्या वरचढ होणार नाहीत. एखाद्या परिस्थितीबद्दल आपल्या भावना परिवर्तित व्हाव्यात अशी इच्छा असल्यास, त्या भावनेमागील विचार बदलायला हवा. उदा. एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीबद्दल राग येताच, चटकन निष्कर्षांस उतरणे टाळावे आणि प्रतिक्रिया देण्याआधी, त्याच परिस्थितीकडे पाहण्याचे निरनिराळे, एकाहून अधिक दृष्टीकोन पडताळून पाहावे. प्रत्येक घटनेत स्वत:ला केंद्रबिंदू न मानता, भावनिक मोकळीक देत, इतरांचे वागणे हे ‘त्यांचे’ आहे, ‘त्यांच्या दृष्टीने योग्य’ याची मुभा द्यावी. अशाप्रकारे दृष्टिकोनाचा आवाका विस्तारणे हे गैरसमजांचे सावट रोखण्यास मदत करेल. जमेल तितक्या महत्त्वाच्या घटना- परिस्थितींमध्ये एकापेक्षा अधिक पर्याय योजावेत, म्हणजे एखाद्या पर्यायाला यश लाभले नाही, तरी इतर पर्यायांची त्याला जोड लागेल. त्यामुळे एक पर्याय फसला आणि भावनिक  भूकंपाला सामोरे जाण्याऐवजी इतर पर्यायही पडताळून पाहण्याची भावनिक तयारी करता येईल.

गरजेचा भासल्यास विनम्र स्पष्टवक्तेपणा अवलंबावा. आपल्याला काय मान्य आहे वा अमान्य आहे, म्हणजेच आपल्या मर्यादा ओळखून त्यावर आग्रही राहण्यास हरकत नसावी. स्वत: किंवा इतरांनी या मर्यादा ओलांडल्या की भावनिक संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मर्यादा स्वत: योजाव्यात, राखून ठेवाव्यात आणि इतरांपर्यंत त्यांची माहिती वेळोवेळी पोहोचवावी. अडमुठय़ा, अहंकारी, तर्कहीन वागणाऱ्या जटिल मानसिकतेच्या व्यक्तींशी सामना करताना आपल्या भावनिक व्यवस्थापनाचा कस लागतो. घरात किंवा नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी अशा मानसिकतेच्या लोकांचा सहवास आपल्याला ‘रुतत चालल्या’च्या भावनेकडे नेऊन सोडतो. आपला त्यांच्याशी संबंध येणारा दिवसच काय तर संपूर्ण जीवन या आव्हानात्मक व्यक्तींमुळे विस्कटण्याचा संभव असतो. अशावेळी संभाव्य बौद्धिक प्रतिकारास झिडकारून, स्वत:ला त्या व्यक्तीच्या भूमिकेत नेऊन सोडावे. त्यामुळे आपल्याला कदाचित त्याची स्थिती व वर्तणुकीची कारणं तपासून पाहता येतील.  याचा अर्थ समोरच्या व्यक्तीचे अयोग्य- अवाजवी वागणेही निमूटपणे पचवून घ्यावे का, तर अजिबात नाही. ही भूमिका केवळ आपल्या स्वत:ला करून दिलेली आठवण आहे, की  प्रत्येक व्यक्ती आपापल्या समस्या- जीवनाच्या आकलनातून वागत आहे. आपण संयम, सहिष्णुता दाखवून आणि समोरच्या व्यक्तीला सवलत देऊनही ती व्यक्ती स्वत:ची कूटनीती, उथळ राजकारण, इ. सुरूच ठेवत असल्यास, त्यातून त्या व्यक्तीची व तिच्या उथळपणाची, अविचारी धोरणाचीच ओळख ठरत असते, आपली नव्हे.

याशिवाय भावनिक सशक्तीकरणही व्यवस्थापनाइतकेच महत्त्वाचे आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. बऱ्याचदा या सशक्तीकरणाचा पाया हा निकटच्या नातेसंबंधांमध्ये रोवला जातो. जवळच्या व्यक्तीपर्यंत प्रेमाच्या, कौतुकाच्या, कृतज्ञतेच्या, तिच्या आपल्या आयुष्यातील अनिवार्यतेच्या आपल्या भावना पोहोचवणे, ही एक वरकरणी साधी वाटणारी, पण अतिशय खोलवर आणि दूरगामी परिणाम करणारी बाब आहे. अशा सवयीमुळे आपण आपल्या भावना नेमक्या कशा आहेत यावर लक्ष केंद्रित करतो, त्या सजगपणे अनुभवतो, इतरांकडे प्रगल्भतेने पोहोचवतो किंवा अयोग्य पद्धत अवलंबल्यास, त्यात सुधार आणण्यास तयार होतो. आणि ही मिळालेली शिकवण इतर प्रसंगांत (औपचारिक) लागू होत जाते.

सार हे, की भावनिक बुद्धिमत्ता आणि सशक्तीकरण हे एक कौशल्य आहे, सरावाने आणि जागरूकतेने अवगत करता येण्यासारखं. आपण प्रतिक्रिया काय स्वरूपाच्या देतो, विचारपूर्वक देतो का, वस्तुस्थितीचे अवलोकन न करताच निकाल लावून टाकतो का, निष्कर्षांवर येतो का, याचेही निरीक्षण करावे. तणावाच्या परिस्थितीत, आव्हानात्मक, स्पर्धेच्या,  नाराजीच्या स्थितीत आपण कसे वागतो, त्याला कसे सामोरे जातो याचा आढावा घ्यावा. संयम की उतावळेपणा- यातील  आपला जवळचा सांगाती कोण आहे, हे पाहावे. आणि सर्वात कठीण पण सगळ्यात महत्त्वाचे, आपण स्वत: भावनिक ढाच्याची, प्रकटीकरणाची जबाबदारी नेहमी उचलतो का, इतरांच्या दबावाला, करिष्म्याला बळी पडतो का, हे पडताळावे. माझ्या भावनांवर  आणि त्यांच्या निवडीवर (प्रतिक्रियांवर) मी स्वत:  जास्तीतजास्त  नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होत आहे की इतरांना दोष देत, त्यांना आपल्या भावनांवर सत्ता गाजवण्यास मुभा देत आहे, हे स्वत:ला नियमित विचारावे.

‘भावना’ हा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे त्या जपण्याची गरजही तितकीच आहे- स्वत:च्या आणि इतरांच्याही. पण यात ओढाताण होऊन भावनिक दमछाक टाळण्यासाठी समतोल महत्त्वाचा! इतरांच्या गरजा, भावना यांचा आदर ठेवून, त्यात अडथळे निर्माण न करता स्वत:च्या गरजा – भावनांचा विचार करणे हे योग्य ठरेल. ही तारेवरची कसरत आहे, यात काही संदेह नाही; पण अलगद पावले टाकल्यास, प्रत्येक  पाऊल विचारपूर्वक  टाकल्यास, प्रत्येक पाऊल टाकल्याचा आनंद बाळगल्यास,  प्रत्येक टाकलेले पाऊल हे ध्येयाच्या जवळ नेत असल्यामुळे महत्त्वाचे मानल्यास आणि निसटणे टाळण्यासाठी चालतच राहिल्यास भावना आपल्यावर स्वार होण्याऐवजी आपल्या सोबती आणि शक्ती ठरतील, हे नक्की!

ketki.gadre@yahoo.com

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2016 1:36 am

Web Title: article on women emotion
Next Stories
1 ‘निर्णया’चा महामेरू
2 ‘जीवन’शाळा
3 ‘च’ची बाधा
Just Now!
X