आजी-आजोबांकडे जाणं हा लहान असल्यापासून नेहमीच एक जिव्हाळाभरला अनुभव राहिला आहे. याचं एक प्रेमळ कारण म्हणजे- जरी वरचेवर आमचं आजोळी जाणं होत असलं तरी दरवेळी तिथं होणारं  जय्यत आणि जोरदार स्वागत. एखाद्या सेलिब्रेटीचं त्याचे चाहते करतील अगदी तसं. आठवणीत ताजंतवानं राहील असं. आपण किती महत्त्वाचे आहोत हे त्यांच्या बोलक्या डोळ्यांतून आणि मनापासून हसण्यातून, त्यातील ऊर्जेतून, चैतन्यातून सहज जाणवायचं. आणि आजही जाणवतं. कारण  असं स्वागत आजही होत असतं.  हे असं ‘सेलिब्रेटी स्टेटस’  आम्हाला बहाल केल्यावर आजी-आजोबांना आमच्या प्रत्येक घडामोडीबद्दल जाणून घ्यायचं असायचं. त्याबद्दल कुतूहल, कौतुक असायचं. थोडक्यात, माझ्या आयुष्यात काय आणि कसं चाललं आहे, माझं काय नवं लिखाण, संशोधन सुरू आहे, कोणते महत्त्वाचे निर्णय मी घेतलेत, अशा असंख्य गोष्टींबद्दल त्यांना आस्थेपोटी चौकशी करायची असायची. आपल्याला समजून घेणारे असे प्रेमळ श्रोते मिळाल्यावर मलाही मनमोकळेपणी बोलता यायचं, आजही येतं!

परंतु निखळ नात्यातून बहाल झालेलं हे ‘सेलिब्रेटी स्टेटस’ आजकालच्या ‘सेलिब्रेटी कल्चर’पेक्षा खूप भिन्न असल्याचं जाणवतं. ‘विशेष’ आणि ‘सामान्य’ या भेदभावामुळे जग आज दोन गटांमध्ये विभागलेलं आहे. ते जे कोणी ‘विशेष’ आहेत आणि ते जे कोणी (फारसे) विशेष नाहीत, अशा दोन्ही गटांतले लोक या जगात नांदतात. यात काही सर्वानुमते, सर्वमान्य ‘विशेष’, तर काही मात्र स्वयंघोषित! ‘सेलिब्रेटी’ या शब्दातच मुळी ‘सेलिब्रेशन’ हा शब्द दडलेला आहे. म्हणजे ही व्यक्ती दिसली, बोलली, आसपास असली की तो प्रत्येक क्षण ‘सेलिब्रेशन’चा.. उत्सवाचाच असतो! (हल्ली प्रत्येक खासगी सेलिब्रेशनमध्येही हे सेलिब्रेटीज् सक्रिय भाग घेतात, गातात, नाचतात- ते निराळं!) या सेलिब्रेटेड जगाची आणि त्यातील (सेलिब्रेटिज्) व्यक्तींची स्वत:ची एक अनोखी मानसिकता असल्याचं जाणवतं. हे चकाचौंद विश्व म्हणजे प्रसिद्धी, लोकप्रियता, प्रकाशझोत, चाहते, नावीन्य, रंजकता, सुबत्ता असा समज आहे.  परंतु  याबरोबरच येते ती अशाश्वतता, अस्थिरता, ‘ओळख’ निर्माण करण्याची चढाओढ, ती जपण्याची आणि टिकवून ठेवण्याची धडपड! ही एक प्रकारची झिंगच. क्वचित व्यसनही! बहुतांश लोकांची आपण लोकप्रिय (फेमस) व्हावं अशी सुप्त इच्छा असते. यात केवळ प्रौढच नव्हे, तर हल्ली लहान मुलांनाही ‘मोठे झाल्यावर काय व्हायचे आहे?’ असं  विचारल्यावर ते डॉक्टर, चित्रकार, वैमानिकअसे व्यवसाय सांगण्याऐवजी ‘मला फेमस व्हायचं आहे’ अशी उत्तरे देतात. ताप-खोकल्याची साथ यावी तसा प्रसिद्धी, लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवण्याचा हा साथीचा रोग म्हणावा का? याला प्रसारमाध्यमांनीही मोलाचा हातभार लावला आहे.

delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
Till 31st March Shani Uday Surya Gochar Astrological Events Will Make Mesh To Meen 12 Rashi Rich Money Power Health Marathi Horoscope
३१ मार्चपर्यंत ‘या’ राशी तन-मन-धनाने होतील श्रीमंत; होळी आधी शनी, सूर्यासह ४ ग्रहांचे गोचर, १२ राशींना कसा जाईल मार्च?
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

‘क’ स्पेशालिस्ट हे प्रकाशझोताचे निस्सीम चाहते त्यात असतील तर त्याचं फारसं नवल वाटत नाही. परंतु केवळ ‘मी..मी’ करणारेच लोकप्रिय बनू पाहतात का? तर तसंही नाही! कारण बहुदा ‘प्रसिद्धी’चा अर्थ  प्रत्येकासाठी एकसारखा नसतो. काहींच्या मते, लोकप्रियता आपल्यासाठी सुबत्ता- समृद्धी आणते, तर काहींच्या मते- भरघोस यश. तर काहींसाठी ती सत्तेचे माहेरघर, सामर्थ्यांचे प्रतीक असते. काही जणांसाठी लोकप्रियता म्हणजे प्रेम, इतरांनी आपली घेतलेली दखल असते, तर काहीजण त्यातून स्वत:चं कौतुक, लाड करून घेत असतात. याशिवाय काहीजण त्यातून इतरांना मदत करण्याची सुवर्णसंधीही शोधत असतात. तर काही जणांसाठी ती इतरांकडून प्रशंसा  मिळवण्यासाठीची धडपड असते. आणि हे सर्व एकदाच नाही, तर अनेकदा- किंबहुना प्रत्येक वेळी मिळावं अशी इच्छा किंवा अट्टहास बाळगण्यास प्रवृत्त करणारी अशी ही लोकप्रियता! तिची झिंग चढलेल्यांना ती मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी प्रसंगी कोणत्याही थराला नेऊन पोहोचवू शकते. परंतु जाणिवा जागृत ठेवून, पाय जमिनीवर रोवून आकाशात झेप घेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगल्यास  आणि त्यासाठी वाहवत जाऊन अयोग्य निर्णय अथवा परिस्थिती ओढवून न घेण्याची खबरदारी घेतल्यास हीच लोकप्रियता यशस्वीतेचं शिखरही गाठू देण्यास सहाय्यक ठरते.

मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनावरून आणि पाश्चिमात्य खऱ्या सेलिब्रेटीज्बरोबर केलेल्या चर्चेतून काही अनुभव आणि दृष्टिकोन समोर आले. या चर्चेतून पुढे आलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे- प्रसिद्धीच्या समृद्धीबरोबर येणारे एक प्रकारचे नुकसान! परंतु यात गंमत म्हणजे हे नुकसान टाळण्यासाठी आपली लोकप्रियता त्यागण्याची काल्पनिक संधी या सेलिब्रेटीज्ना दिल्यावर  त्यांनी  ती संधी मात्र नाकारली. प्रसिद्धीबरोबर येणारे हे नुकसान म्हणजे स्वत:चे खासगी आयुष्य पुरेपूररीत्या जगता न येणे. एकदा  का प्रसिद्धीचं कोंदण लाभलं, की आपलं जीवन, त्यातील छोटय़ा-मोठय़ा घडामोडी, आपल्या पेहरावाच्या निवडी, खाद्यखुराक, भटकंती, खासगी नातेसंबंध, आपली सामाजिक बांधिलकी, व्यावसायिक वा वैयक्तिक निर्णय आदी बाबी सतत सार्वजनिक दुर्बिणीखाली येत असतात. यामुळे कधी कधी  स्वत:चं ‘खासगी’ असं आयुष्य अस्तित्वातच राहिलं नसल्याचं वाटू शकतं.  प्रत्येक घडामोडीकडे ओळखीच्या तसंच अनोळखी लोकांच्या डागलेल्या नजरा या सुरुवातीला आपण कोणीतरी ‘विशेष’ असल्याचा आभास घडवतात; परिणामी प्रसिद्धीची ही झिंग, इतरांनी घेतलेली आपली दखल प्रारंभी हवीहवीशी वाटते. आणि हे सगळं कायमस्वरूपी राहील असा विश्वासही वाटतो. काहींच्या बाबतीत हे खरं ठरतं, तर काहींच्या बाबतीत ते असतं केवळ मृगजळ! सेलिब्रेटी झाल्यावर आपण इतरांवर ठेवलेल्या आणि इतरांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाचं ताळतंत्र बदलत जातं. बऱ्याचदा साशंकतेचं सावट नात्यांना ग्रासू लागतं. सेलिब्रेटी असणं म्हणजे एखादा अशाश्वत साथीदार सोबत बाळगण्यासारखंच आहे. हा साथीदार कधी आपली साथ सोडून निघून जाईल हे सांगता येणार नाही. असे झाले तर प्रकाशझोताकडून अंध:कारात लोटल्याचा येणारा अनुभव  पचवणं, स्वीकारणं हे महाकर्मकठीण होतं. क्वचित प्रसंगी यातून नैराश्यही येऊ शकतं.  अशावेळी निकटतम कुटुंबीयांनी या लोकप्रिय व्यक्तीच्या जीवनपटात आपलं स्थान कोठे निश्चित करायचं, लोकप्रियतेबरोबर येणाऱ्या आव्हानांना कसं तोंड द्यायचं, त्या व्यक्तीशी असलेल्या आपल्या नात्याच्या स्वरूपात काहीएक बदल होताना दिसताहेत- ते अपेक्षित आहेत का.. असे अनेक मूलभूत प्रश्न निर्माण होतात.

लोकप्रियतेची ही नकारघंटा वाजवण्याचं एक मुख्य कारण हे, की प्रसारमाध्यमे ‘सेलिब्रेटी’ असण्याची ही बाजू फारशी चर्चेत येऊ देत नाहीत. आपल्या दृष्टीस पडते ते केवळ त्यांच्या दिमाखदार, हेवा वाटेल अशा जीवनशैलीचं चित्र. या चित्रणातून  निर्माण केल्या गेलेल्या या जगाचा आपण हिस्सा बनणं कठीणच. किंबहुना, तिथपर्यंत पोहोचणंही आपल्यासाठी कठीण. नाण्याची ही दुसरी बाजू आपल्यापर्यंत पोहोचू न देणं ही कदाचित  सेलिब्रेटीज्चीही इच्छा असावी. कारण चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करण्याकरता घेतलेले कष्ट, मेहनत, सचोटी आणि मोठा कालावधी हा या बाजूपेक्षा त्यांना अधिक महत्त्वाचा वाटत असावा. ‘सेलिब्रेटी’ म्हणून ओळख कायम ठेवणं म्हणजे तारेवरची कसरतच. पाय निसटला की खेल खत्म- अशी काहीशी यांची समीकरणं! अत्युत्तम कामगिरी बजावून ‘सेलिब्रेटी’  बनणं आणि ते बनण्यासाठी काहीतरी काम उकरून काढणं, नावापुरती, जुजबी कामगिरी बजावणं- यांत फरक आहे. मानसिकतेचा हा दुसरा प्रकार (उकऱ्यांचा) क्षणभंगुर आहे. पण हल्ली लोक तेही चालवून घेताहेत याचीच खंत वाटते. आपले ज्ञान, कला, कौशल्य प्रामाणिकपणे लोकांसमोर आणणारे, लोकहितवादी कार्यपद्धती अवलंबणारे, जनहितासाठी झटणारे, कष्टाळू, मेहनती, सामाजिक भान आणि जबाबदारी निष्ठेने पाळणारे लोक हेच खरेखुरे सेलिब्रेटीज् होत. आपली प्रतिभा  हीच केवळ आपली ओळख नसून, आपले व्यक्तित्व त्याहूनही (स)खोल आहे, त्याला आणखीही कंगोरे आहेत, हे जाणणारी माणसे (फुकाच्या) सन्मानाने हुरळून जात नाहीत. लोकप्रियतेची ही गडद आणि गूढ बाजू पडताळताना तिचे खरे मानकरी तर विसरले जात नाहीत ना, निवडक क्षेत्रांनाच प्राधान्य दिले जात नाही ना, किंवा त्यातील तथाकथित यशवंतांचाच उदाउदो करून जे खऱ्या अर्थी  प्रेरणास्थान बनण्याच्या पात्रतेचे आहेत त्यांना डावलले जात नाही ना, आदी बाबीही तपासून पाहायला हव्यात.  आज प्रेरणास्थान मानावे अशा व्यक्तींना फारसे लोकांसमोर आणलेच जात नाही. आणले गेले, तरीही क्षणभर त्यांची पाठराखण करून पुन्हा पडद्यावर येतात ते तेच नेहमीचे चमकते चेहरे. या सगळ्या भूलभुलय्यामध्ये खऱ्या अर्थाने सेलिब्रेट करण्याजोगे ज्यांचे कार्य आहे, व्यक्तिमत्त्व आहे, असे चेहरे अचूक ओळखण्याची जबाबदारी आपली आहे.  आपण मानत असलेल्या श्रद्धास्थानांना (योग्य मूल्यमापन करून उच्चस्थानी बसवलेल्या व्यक्तींना) वंदन करून, त्यांची कामगिरी स्मरणात ठेवून त्यातून प्रेरणा घेणे ही आपलीच जबाबदारी आहे. आपण जरी रूपेरी पडद्यावर झळकत नसलो, ‘पेज थ्री’वर आपला पार्टी करतानाचा फोटो जरी छापून येत नसला, किंवा आपल्याकडे आलिशान बंगला आणि बंगल्याबाहेर चार-चार महागडय़ा, आलिशान गाडय़ा, मिळालेले मानसन्मान व पुरस्कारांसाठी आपल्या घरात जरी स्वतंत्र दालन नसलं, आपण परदेशातील संध्याकाळ जरी अनुभवत नसलो, तरीही कोणा एका व्यक्तीच्या जीवनाचा तरी आपण अविभाज्य भाग (सेलिब्रेटी) नक्कीच आहोत, हे ओळखणे गरजेचे आहे. आपण जसे आहोत तसे आपल्याला कुरबुरत का होईना, स्वीकारणारी आपली जिवाभावाची माणसे आहेत. आपण कुठे जावं, काय खावं, कसं दिसावं, काय पेहराव असावा, अशा प्रकारची फारशी बंधनंही आपल्यावर नाहीत. आपण सतत इतरांच्या मर्जीस उतरायला हवं, ही सक्तीही नाही. त्यामुळे विसंगत अपेक्षांचे ओझेही आपल्यावर तसे तुलनेत कमीच! म्हणजे ‘grass is greener on the other side’ असं जरी भासत असलं तरीही त्या रूपेरी विश्वाची भुरळ पडून, त्याकडे आकर्षित होऊन आपल्या रास्त महत्त्वाकांक्षांचा आणि मानवी जीवनाच्या प्रयोजनाचा, मूळ गाभ्याचा आपल्याला विसर न पडावा. कारण आपण कार्यरत आहोत ते आत्मिक आणि सामाजिक कल्याणासाठी. आणि याची पोचपावती केवळ सार्वजनिक स्वीकारातून मिळवण्यापेक्षा आपल्या आत्मविश्वासाच्या व स्वाभिमानाच्या बळावर मिळवलेली बरी. कारण लोक काय, आज मखरात बसवतील, उद्या विसर्जितही करून टाकतील. यात आपली साथ सोडणार नाहीत ती आपल्यावर निखळ प्रेम करणारी आपली जीवाभावाची माणसंच. त्याचबरोबर आपल्या प्रतिभेव्यतिरिक्तआपलं काहीएक स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तित्व आहे, याचा मान राखणारी ओळखीची/ अनोळखी माणसंसुद्धा. तसेच आपला आत्मविश्वास, वस्तुस्थितीनिष्ठ निग्रह आणि सामान्य राहून असामान्यता मिळवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्नदेखील. हे पटलं तर मग प्रत्येक क्षण सेलिब्रेशनचा. आणि आपण स्वत:च्या आणि जीवलगांच्या नजरेत कायमच सेलिब्रेटी!

केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)